IPL 2024 Video : गुजरात टायटन्स आणि कोलकाता नाईट रायडर्स यांच्यातील सामना पावसाच्या व्यत्ययामुळे रद्द झाला. पावसाने केलेल्या बॅटिंगमुळे यजमान गुजरात टायटन्सचे यंदाच्या हंगामातील आव्हान संपुष्टात आले. आयपीएलचा सतरावा हंगाम विविध कारणांनी खास आहे. चौकार आणि षटकारांचा पाऊस यंदा पाहायला मिळत आहे. अशातच अतिउत्साही चाहत्यांची भन्नाट झलकही पाहायला मिळाली. विराट कोहली, रोहित शर्मा आणि महेंद्रसिंग धोनी यांना भेटण्यासाठी त्यांच्या चाहत्यांनी थेट मैदान गाठले. आता अशाच एका अतिउत्साही चाहत्याचा व्हिडीओ समोर आला आहे. (IPL 2024 News)
सोमवारी अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडियमवर गुजरात आणि केकेआर यांच्यात सामना होणार होता. पण, पावसाच्या व्यत्ययामुळे नियोजित सामना होऊ शकला नाही.
सोशल मीडियावर एक व्हिडीओ खूप व्हायरल होत आहे, ज्यामध्ये रिंकू सिंगच्या नावाची जर्सी परिधान केलेल्या चाहत्याने एकच गोंधळ घातला. संबधित चाहता चेंडू घेऊन पळ काढण्याच्या प्रयत्नात होता. तितक्यात पोलीस कर्मचाऱ्यांनी मध्यस्थी करत त्याला रोखले. खरे तर या चाहत्याने चेंडू पँटमध्ये टाकला होता.
दरम्यान, गुजरात आणि कोलकाता यांच्यातील सामना पावसामुळे होऊ शकला नाही, पण मैदानावर यजमान संघाने केलेली काही खास व्यवस्था चाहत्यांच्या चेहऱ्यावर हसू आणण्यासाठी पुरेशी होती. सामना रद्द झाल्यानंतर कर्णधार शुबमन गिल आणि संपूर्ण संघाने स्टेडियममध्ये फेरफटका मारला आणि चाहत्यांचे आभार मानले. आपल्या चाहत्यांनी दिलेल्या पाठिंब्याबद्दल गुजरातच्या शिलेदारांनी त्यांच्या प्रेमाला दाद दिली.