प्ले ऑफमध्ये जागा निश्चित केल्यानंतर संजू सॅमसनच्या नेतृत्वातील राजस्थान रॉयल्ससमोरपंजाब किंग्सचे आव्हान आहे. हा सामना म्हणजे राजस्थानचा प्ले ऑफसाठी सराव असेल. राजस्थान बुधवारी आयपीएल लीगमधून बाहेर पडलेल्या पंजाबविरुद्ध खेळणार आहे. ईशान्येकडील प्रतिभावान खेळाडू रियान परागचे, तसेच राजस्थानचेही हे स्थानिक मैदान आहे. राजस्थानला अंतिम चार संघांत स्थान निश्चित करण्यासाठी त्यांना येथे होणाऱ्या दोन सामन्यांपैकी किमान एक सामना जिंकावाच लागेल. त्यामुळे आजचा सामना जिंकून राजस्थान पहिल्या दोन स्थानी जाण्यासाठी प्रयत्नशील असेल.
कर्णधार संजू सॅमसनने यंदाच्या हंगामात ४८४, तर रियान परागने शानदार ४८३ धावा केल्या आहेत. यशस्वी जैस्वाल, जोस बटलर यांनी देखील धावांचे योगदान दिले आहे. गोलंदाजी रॉयल्सच्या जमेची बाब ठरली. सांघिकपणे मारा करण्यावर त्यांच्या गोलंदाजांचा भर आहे. डेथ ओव्हरमध्ये संदीप शर्मा, तर सुरुवातीला ट्रेन्ट बोल्ट भेदक ठरले. गुणतालिकेत राजस्थान दुसऱ्या तर पंजाब अगदी तळाशी अर्थात दहाव्या स्थानावर आहे.
शशांक सिंग आणि आशुतोष शर्मा यांनी चांगली कामगिरी केली. सांघिक कामगिरीत हा संघ अपयशी ठरला. जखमी शिखर धवनच्या अनुपस्थितीत काळजीवाहू कर्णधार सॅम करन फारसा प्रभावी जाणवला नाही. गोलंदाजीतही पंजाबचे खेळाडू प्रभावी नव्हते. वेगवान गोलंदाज आणि फिरकीपटूंनी मोठ्या प्रमाणावर धावा मोजल्या.