Shubman Gill With Harleen Deol : सध्या आयपीएलच्या सतराव्या हंगामाचा थरार रंगला आहे. मागील हंगामातील उपविजेता गुजरात टायटन्सचा संघ यंदा नवीन कर्णधाराच्या नेतृत्वात खेळत आहे. युवा शुबमन गिल गुजरातच्या संघाची धुरा सांभाळत आहे. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूविरूद्धच्या सामन्यापूर्वी गिल भारतीय महिला क्रिकेट संघाची खेळाडू हरलीन देओलला फलंदाजीचे धडे देताना दिसला. शुबमन आणि हरलीन यांचा हा व्हिडीओ फ्रँचायझीने शेअर केला आहे. हरलीन महिला प्रीमिअर लीगमध्ये गुजरातच्या फ्रँचायझीचा भाग आहे. पण, दुखापतीमुळे ती सध्या क्रिकेटपासून दूर आहे.
आयपीएलच्या यंदाच्या हंगामात गुजरातचा संघ संघर्ष करत आहे. प्ले ऑफच्या शर्यतीतून गिलचा संघ बाहेर होण्याची शक्यता आहे. गुजरातला दहापैकी केवळ चार सामने जिंकता आले असून सहा सामन्यात पराभव पत्करावा लागला आहे. गुणतालिकेत आठव्या स्थानावर असलेल्या गुजरातला अजून चार सामने खेळायचे आहेत.
प्ले ऑफच्या शर्यतीत कायम राहण्यासाठी गुजरातला उर्वरीत सर्व सामने जिंकावे लागतील. असे झाल्यास त्यांचे एकूण १६ गुण होतील. तरी देखील त्यांना प्ले ऑफमध्ये जागा मिळवण्यासाठी इतर संघांशिवाय नेट रनरेटवर अवलंबून राहावे लागेल. गुजरातचा आताच्या घडीला रन रेट नकारात्मक आहे. पण, आरसीबीविरूद्धचा सामना गमावल्यास गुजरातचे स्पर्धेतील आव्हान संपुष्टात येईल.
शुबमन गिलचा खराब फॉर्म गुजरात टायटन्सचा कर्णधार शुबमन गिल यंदा काही खास करू शकला नाही. त्याने १० सामन्यांमध्ये केवळ ३२० धावा केल्या आहेत. त्याची सर्वोच्च धावसंख्या नाबाद ८९ अशी राहिली. आपल्या कर्णधाराचा खराब फॉर्म संघाच्या खराब कामगिरीसाठी कारणीभूत ठरला.