Virat Kohli On Gautam Gambhir: भारताचा स्टार खेळाडू विराट कोहली आणि माजी खेळाडू गौतम गंभीर यांच्यातील संघर्ष जगजाहीर आहे. आयपीएलच्या मागील हंगामात याचा प्रत्यय पाहायला मिळाला होता. आरसीबीचा आघाडीचा फलंदाज विराट कोहली आणि लखनौ सुपर जायंट्सचा तत्कालीन मार्गदर्शक गौतम गंभीर आमनेसामने आले होते. आयपीएलच्या सतराव्या हंगामात गंभीर केकेआरच्या संघाचा मार्गदर्शक आहे. बंगळुरू येथील चिन्नस्वामी स्टेडियमवर आरसीबी आणि केकेआर यांच्यात लढत झाली. केकेआरने विजय मिळवून यजमानांचा विजयरथ रोखला.
केकेआरविरूद्धच्या सामन्यात विराट कोहलीने आरसीबीकडून किल्ला लढवला. विराटच्या अर्धशतकी खेळीचे कौतुक करताना गंभीरने त्याची गळाभेट घेतली होती. मिठी मारून किंग कोहलीला दाद दिली होती. याचाच दाखला देत आता विराटने एक मिश्किल टिप्पणी केली आहे. 'पुमा'च्या कार्यक्रमात बोलताना विराटने सांगितले की, माझ्या वागण्यामुळे लोकांमध्ये नाराजी आहे. मी नवीन-उल-हक आणि गौतम गंभीर यांना मिठी मारल्याने त्यांच्या मनोरंजनाला ब्रेक लागला. त्यांना आता काहीच मसाला मिळत नाही.
मागील आयपीएल हंगामात गंभीर आणि अफगाणिस्तानचा वेगवान गोलंदाज नवीन-उल-हक यांच्याशी विराटचा वाद झाला होता. पण, आता या दोघांशीही विराटने गळाभेट घेतल्याने वादाला पूर्णविराम मिळाला. यावरून काही चाहते भन्नाट मीम्स व्हायरल करत आहेत.
फाफ डुप्लेसिसच्या नेतृत्वातील आरसीबीचा संघ यंदा देखील संघर्ष करत आहे. विराट कोहली चांगल्या फॉर्ममध्ये असला तरी सांघिक खेळीचा अपवाद आरसीबीला पराभवाच्या दिशेने नेत आहे. विराट ऑरेंज कॅपच्या शर्यतीत आघाडीवर असून त्याने आतापर्यंत ३१६ धावा केल्या आहेत. केकेआरविरूद्धच्या सामन्यात त्याने ८३ धावांची अप्रतिम खेळी केली पण तरीदेखील आरसीबीला पराभव पत्करावा लागला. खराब गोलंदाजी संघाची डोकेदुखी वाढवत आहेत.