IPL 2024 Updates : आयपीएल २०२३ चा हंगाम म्हणजे वेगवान गोलंदाज यश दयालसाठी एक वाईट स्वप्नच. कोलकाता नाईट रायडर्सचा फलंदाज रिंकू सिंगने तत्कालीन गुजरात टायटन्सच्या यश दयालच्या एका षटकात ५ षटकार ठोकले होते. तेव्हापासून रिंकू आणि यश दोघेही प्रसिद्धीच्या झोतात आले. पण, दोघांना मिळणारी प्रसिद्धी ही वेगवेगळी होती. रिंकूला या एका षटकाने स्टार बनवले तर यश दयाल दडपणाखाली गेला. या सामन्यानंतर तो क्रिकेटपासून काहीसा दूर झाल्याचे पाहायला मिळाले. पण, आयपीएलच्या सतराव्या अर्थात चालू हंगामात यश दयालने चांगली कामगिरी केली. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूच्या फ्रँचायझीने ५ कोटी रूपयांत यशला आपल्या ताफ्यात घेतले. (IPL 2024 News)
साखळी फेरीतील अखेरचा सामना आरसीबी आणि चेन्नई यांच्यात झाला. या सामन्यातील अखेरचे षटक यश दयाल टाकत होता. त्याला आपल्या संघाला प्ले ऑफमध्ये घेऊन जाण्यासाठी १७ धावांचा बचाव करणे आवश्यक होते. अशा दबावाच्या स्थितीत या युवा गोलंदाजाने अप्रतिम कामगिरी करताना आरसीबीला विजय मिळवून दिला. शेवटच्या षटकात यशने महेंद्रसिंग धोनीला बादे केले. याशिवाय २ निर्धाव चेंडू टाकले.
यश दयालचे वडील भावूक आपल्या लेकाची ही कामगिरी पाहून यश दयालचे वडील चंद्रपाल दयाल हे भावूक झाले. त्यांनी त्यांच्या आयुष्यातील कठीण प्रसंग सांगताना म्हटले की, जेव्हा आरसीबीने यश दयालला ५ कोटी रूपयांमध्ये खरेदी केले तेव्हा एकाने म्हटले होते की, आरसीबीने पैसे बर्बाद केले आहेत. हे पाहता आम्ही कुटुंबीयांनी सर्व व्हॉटसॲप ग्रुपमधून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला. पण, तेव्हा ट्रोल करणारी मंडळी आज आमचे अभिनंदन करत आहे. मात्र, आता कोणीच यशने कोणत्या परिस्थितीचा सामना केला याबाबत विचार करत नाही.
दरम्यान, मागील वर्षी यश दयालच्या एकाच षटकातील ५ चेंडूत ५ षटकार गेल्यानंतर त्याच्या आईची तब्येत बिघडल्याच्या बातमीने सर्वांनाच धक्का बसला होता. पण आता आरसीबी विरुद्ध चेन्नई सामन्याचा हिरो बनल्यानंतर यशने त्याच्या आईला व्हिडीओ कॉल केला तेव्हा त्यांनी सर्वप्रथम विचारले की, तुला आता या क्षणी कसे वाटत आहे? खरे तर यश दयालच्या चमकदार कामगिरीने आरसीबीच्या विजयात मोलाचे योगदान आहे.