Phil Salt Run Out Video: श्रेयस अय्यरचे अर्धशतक आणि फिल सॉल्टची फटकेबाजी याच्या जोरावर कोलकाताने ६ बाद २२२ धावांपर्यंत मजल मारली होती. या आव्हानाचा पाठलाग करताना विल जॅक्स आणि रजत पाटीदार या दोघांनी अर्धशतके ठोकली आणि शतकी भागीदारी केली. हे दोघे बाद झाल्यावर शेवटच्या षटकापर्यंत सामना रंगला. कर्ण शर्माने तीन षटकार लगावत सामना रंगतदार केला. पण अखेर विकेटकिपर फिल सॉल्टने मारलेली उडी आणि केलेला रन आऊट निर्णायक ठरला.
कोलकाताने दिलेल्या आव्हानाचा पाठलाग करताना बंगळुरूच्या संघाचा एक धावेने पराभव झाला. अटीतटीच्या रंगलेल्या सामन्यात शेवटचा चेंडू अतिशय महत्त्वाचा ठरला. बंगळुरूला विजयासाठी शेवटच्या षटकांत १५ धावांची गरज होती. मिचेल स्टार्कने कर्ण शर्माला गोलंदाजी केली. कर्ण शर्माने तीन षटकार लगावत सामना दोन चेंडू तीन धावांच्या आवश्यकतेपर्यंत आणला. पण त्यानंतर कर्ण शर्मा झेलबाद झाला. अखेर एका चेंडूत बंगळुरूला तीन धावांची आवश्यकता होती. त्यावेळेस मिचेल स्टार्कने टाकलेला चेंडू फलंदाजाने सीमारेषेच्या दिशेने टोलावला. सीमारेषेवर फिल्डरने चेंडू अडवून तो कीपर कडे थ्रो केला. चेंडू किपरपासून थोडासा लांब असल्यामुळे फिल सॉल्टला चेंडू पटकन हातात पकडावा लागला. धाव पूर्ण होण्याआधीच चेंडू स्टंपला लावणे आवश्यक असल्याने त्याने हवेत झेप घेत चेंडू स्टंपला लावला आणि त्यामुळेच अतिशय अटीतटीच्या झालेल्या सामन्यात कोलकाता ने बंगळुरूला एका धावेने पराभूत केले. पाहा व्हिडिओ-
दरम्यान, प्रथम फलंदाजी करताना सलामीवीर फिल सॉल्टने १४ चेंडूत ४८ धावा केल्या. सुनील नारायण १०, अंगक्रिश रघुवंशी ३, वेंकटेश अय्यर १६ धावांवर माघारी परतले. त्यानंतर कर्णधार श्रेयस अय्यरने ३६ चेंडूत ७ चौकार आणि एक षटकार खेचत ५० धावा केल्या. रिंकू सिंगने १६ चेंडूत २४, आंद्रे रसेलने २० चेंडूत नाबाद २७, रमणदीप सिंगने ९ चेंडूत नाबाद २४ धावा करून संघाला ६ बाद २२२ धावांपर्यंत मजल मारून दिली. आव्हानाचा पाठलाग करताना विराट १८ धावांवर बाद झाला. त्याच्या विकेटवरून वाद रंगला. पुढे फाफ डु प्लेसिस ७ धावांतच परतला. मग विल जॅक्स आणि रजत पाटीदार जोडीने ४८ चेंडूत १०२ धावांची भागीदारी केली. पण आंद्रे रसेलने एका षटकात आधी विल जॅक्स (३२ चेंडूत ५५) आणि मग रजत पाटीदार (२३ चेंडूत ५२) दोघांना बाद केले. दिनेश कार्तिकने २५ धावा केल्या. शेवटच्या षटकात कर्ण शर्माने ३ षटकार खेचत सामना २ चेंडूत ३ धावांपर्यंत आणला होता. पण विकेटकिपर फिल सॉल्टने हवेत झेप घेत रन आऊट केले आणि KKRने सामना जिंकला.