LSG Owner Sanjiv Goenka : लखनऊ सुपर जायंट्सचे मालक संजीव गोयंका यांचा सनरायझर्स हैदराबादविरुद्धच्या सामन्यानंतर केएल राहुलला फटकारतानाचा व्हिडिओ सध्या खूप चर्चेत आहे. हा व्हिडीओ लखनऊला हैदराबादकडून १० गडी राखून पराभव स्वीकारावा लागल्या नंतरचा आहे. लखनऊच्या संघाचे मालक कर्णधार केएल राहुलला ओरडताना दिसत होते.
हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर क्रिकेट चाहत्यानी वेगवेगळ्या प्रतिक्रिया दिल्या होत्या. अनेकांनी हे चुकीचं असल्याचं सांगत संजीव गोएंका यांनी मैदानावर असे करायला नको होतं म्हटलं आहे. मात्र आता त्यावेळी नेमकं काय घडलं हे समोर आलं आहे.
८ मे रोजी लखनऊ सुपर जायंट्सचे मालक संजीव गोयंका आणि कर्णधार केएल राहुल यांच्यातील संभाषणाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. या व्हिडीओवरुन सोशल मीडियावर बरीच चर्चा देखील झाली. काही लोकांनी संजीव गोयंका यांचे समर्थन केले तर काहींनी त्यांचा विरोध करत त्यांना ट्रोल केलं. यामुळे संजीव गोयंका यांनी इंस्टाग्रामवर कमेंट सेक्शन बंद केलं. या सगळ्यात, प्रत्येकाच्या मनात हाच प्रश्न आहे की त्या दिवशी राहुलशी बोलताना संजीव गोएंका इतके भडकले का होते?
इंडियन एक्सप्रेसच्या वृत्तानुसार, लखनऊचे मालक संजीव गोयंका आणि कर्णधार केएल राहुल यांच्यातील संभाषण बहुतेक संघाच्या फलंदाजीबद्दल होते. लखनऊ आणि हैदराबादच्या सामन्यात एलएसजीने प्रथम फलंदाजी करताना २० षटकांत केवळ १६५ धावा केल्या होत्या. दुसरीकडे या वर्षी हैदराबादमध्ये झालेले बहुतांश सामने हे उच्च धाव संख्येचे होते. हैदराबादचा संघ या धावसंख्येचा पाठलाग करण्यासाठी आला तेव्हा अवघ्या १० षटकांत त्यांनी १६६ धावा करून आपलं लक्ष्य गाठले. वृत्तानुसार, गोयंका यांनी संघाच्या खेळण्याच्या शैलीवर प्रश्न उपस्थित केले आणि खेळाडूंचा खेळण्यात अभाव असल्याचे दिसून येतोय, असं म्हटलं.
पराभव झाल्यानंतर कर्णधार केएल राहुल पॅवेलिअनमध्ये परतत होता. त्यावेळी संजीव गोयंका हे संघासोबत बोलण्यासाठी तिथेच थांबले होते. त्यामुळे कॅमेरा दोघांकडे रोखला गेला. गोयंका आणि केएल राहुल यांच्यातील संभाषण सगळीकडे दिसू लागले. त्यावेळी समालोचन करणाऱ्या दक्षिण आफ्रिकेचा माजी कर्णधार ग्रॅमी स्मिथने असे संभाषण बंद दरवाजाआड व्हायला हवे. आजूबाजूला बरेच कॅमेरे आहेत आणि तुम्ही ते टाळू शकत नाही, असं म्हटलं.
दरम्यान, संजीव गोयंका यांचा आयपीएलसोबत जुने नाते आहे. संजीव गोयंका हे रायझिंग पुणे सुपरजायंट्सचे मालक होते आहे. पुण्याचा हा संघ दोन वर्ष आयपीएलमध्ये खेळला होता. २०१६ मध्ये, संघ सातव्या क्रमांकावर आल्यानंतर धोनीला कर्णधारपदावरून हटवण्यात आले आणि त्याच्या जागी स्टीव्ह स्मिथची नियुक्ती करण्यात आली. त्यावेळीही बराच गदारोळ झाला होता.
Web Title: IPL 2024 What was the argument between KL Rahul and LSG Owner Sanjiv Goenka
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.