Rinku Singh : कोलकाता नाईट रायडर्सनेआयपीएल २०२४ चे विजेतेपद पटकावले आहे. अंतिम सामन्यात केकेआरने सनरायझर्स हैदराबादविरुद्ध एकहाती विजय मिळवला. या विजयासह केकेआरने तिसऱ्यांदा हे विजेतेपद पटकावले. या विजयानंतर केकेआरने जबरदस्त सेलिब्रेशन केलं. कोलकाताच्या या विजयामध्ये फलंदाज रिंकु सिंहनेही महत्त्वाची कामगिरी बजावली आहे. त्यामुळे संघात तो सगळ्यांच्याच पसंतीचा ठरत आहे. आयपीएलनंतर रिंकू भारताच्या टी-२० विश्वचषक देखील एक भाग आहे पण राखीव खेळाडू म्हणून. टी-२० फॉरमॅटमध्ये रिंकू हा भारतातील सर्वोत्कृष्ट फिनिशर्सपैकी एक असूनही त्याला केकेआरकडून केवळ ५५ लाख रुपये मिळाले आहेत. दुसरीकडे त्याचा संघातील सहकारी मिचेल स्टार्कने यंदाच्या आयपीएलमध्ये तब्बल २४.७५ कोटी रुपये कमावले आहेत. या विषयी विचारलं असता रिंकूने जबरदस्त उत्तर दिलं आहे.
भारतीय संघाची स्टार क्रिकेटर रिंकू सिंगची धमाकेदार फलंदाजी सर्वांनाच आवडते. याशिवाय रिंकूची मैदानाबाहेरची मस्तीही त्याच्या चाहत्यांना आवडते. कोणत्याही प्रश्नाचे उत्तर देण्याची त्याच्या पद्धतीचे अनेकांकडून कौतुक केलं जातं. आता रिंकू सिंगला त्याच्या आयपीएल लिलावाच्या किंमतीबद्दल प्रश्न विचारण्यात आला होता. दैनिक जागरणच्या मुलाखतीमध्ये हा प्रश्न विचारण्यात आल्यानंतर रिंकूचे दिलेले उत्तर चाहत्यांना खूप आवडले आहे.
मिचेल स्टार्कला केकेआरमध्ये २४.७५ कोटी रुपये मिळत आहेत, तर तुला केकेआरकडून ५०-५५ लाख रुपये मिळत आहेत. लिलावात गेला असता तर करोडो रुपये मिळू शकले असते? असा सवाल रिंकूला विचारण्यात आला होता. त्यावर रिंकूने अगदी साधेपणाने याचं उत्तर दिलं. “५०-५५ लाख रुपये देखील खूप आहेत. जेव्हा मी सुरुवात केली तेव्हा मला वाटलेही नव्हते की मी एवढी कमाई करेन. त्या वेळी लहानपणी मला वाटायचे की दहा-पाच रुपये जरी मिळाले तर कसे मिळावे असे वाटायचे. आता ५५ लाख रुपये मिळणे खूप आहेत. देव जे देतो त्यात आनंदी राहावे हा माझा विचार आहे," असं रिंकू म्हणाला.
“मला अजिबात वाटत नाही की मला इतके पैसे मिळायला हवे होते. ५५ लाख रुपये देऊनही मी खूप खूश आहे. जेव्हा हे नव्हते तेव्हा आम्हाला माहित होते की हे किती पैसे आहेत," असेही रिंकू म्हणाला.
दरम्यान, रिंकू सिंगला २०२२ च्या लिलावात कोलकाता नाईट रायडर्सने ५५ लाख रुपयांना करारबद्ध केले होते. गेल्या वर्षी झालेल्या मिनी लिलावात रिंकूला याच किमतीत कायम ठेवण्यात आले होते. तर मिचेल स्टार्कसाठी कोलकाता नाइट रायडर्सने २४.७५ कोटी रुपये खर्च केले होते. यानंतर अनेक चाहत्यांनी रिंकूला फ्रेंचायझी सोडण्याची मागणीही केली होती. मात्र त्याने तसे केले नाही.