Rohit Sharma hugs Yashavi Jaiswal Video, IPL 2024 Mumbai Indians vs Rajasthan Royals: राजस्थान रॉयल्सने मुंबई इंडियन्सवर 9 गडी राखून मोठा विजय मिळवला. गेल्या काही सामन्यांपासून फॉर्मशी झगडत असलेल्या यशस्वी जैस्वालने या सामन्यात दमदार शतक ठोकून मुंबईच्या गोलंदाजांची धुलाई केली. जैस्वालने 60 चेंडूंमध्ये 9 चौकार आणि 7 षटकारांच्या मदतीने नाबाद 104 धावा कुटल्या. यशस्वी जैस्वालच्या या दमदार खेळीमुळे राजस्थानच्या संघाने पॉवर प्ले पासूनच धुलाई करण्यास सुरुवात केली आणि राजस्थानच्या संघाला शेवटपर्यंत सामन्यात कुठेही कमी पडू दिले नाही. IPL सुरू होण्याआधी सर्वांनाच अशी अपेक्षा होती की यशस्वी जैस्वाल हा यंदाच्या स्पर्धेत दमदार खेळी करून दाखवेल. कारण IPLच्या आधी झालेल्या इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेत यशस्वी जैस्वालने त्याचा आक्रमकपणा आणि संयमी खेळ या दोन्ही गोष्टींचा चाहत्यांना उत्कृष्ट नमुना दाखवून दिला होता. पण IPL मध्ये यशस्वी जैस्वालला अपेक्षेप्रमाणे सुरुवात मिळाली नाही. त्याला फॉर्ममध्ये परतायला आठ सामने जावे लागले. अखेर तो फॉर्ममध्ये परतला आणि त्यानंतर त्याला थेट प्रतिस्पर्धी संघाच्या माजी कर्णधाराकडून 'जादू की झप्पी' मिळाली.
जैस्वालने राजस्थानसाठी शेवटपर्यंत झुंज देत शतक तर ठोकलेच, पण त्यासोबतच विजयी चौकारही मारला. विजयाचा फटका मारल्यानंतर यशस्वी जैस्वालने हवेत हात उंचावून सेलिब्रेशन केले. पण त्यापेक्षा जास्त चर्चा झाली ती, रोहित शर्मा आणि यशस्वी जैस्वालच्या गळाभेटीची. रोहित शर्मा आणि यशस्वी जैस्वाल या जोडीने इंग्लंडविरूद्धच्या मालिकेत अनेकदा भारतीय संघाला दमदार सलामी दिली आहे. या दोघांची सलामी जोडी चाहत्यांनाही पसंत पडली होती. आता जून महिन्यात टी२० वर्ल्ड कपची धूम असणार आहे. अशा परिस्थितीत यशस्वी जैस्वाल हा रोहित शर्माबरोबर सलामीला उतरू शकतो असे बोलले जात आहे.
जर यशस्वी जैस्वालची भारतीय संघात निवड झाली तर त्याचा फॉर्म T20 विश्वचषक स्पर्धेसाठी टीम इंडियाला फायद्याचाच ठरेल. पहिल्या सात सामन्यांमध्ये जैस्वाल चेंडू खूप जोरात मारण्याच्या प्रयत्नात किंवा काहीतरी वेगळे करण्याचा प्रयत्न करताना बाद झाला होता. पण मुंबईच्या गोलंदाजांवर त्याने हल्लाबोल केल्याने त्याची सकारात्मक चर्चा सुरू झाली आहे.
दरम्यान, राजस्थान रॉयल्सने 180 धावांचे कठीण लक्ष्य 9 विकेट्स आणि 8 चेंडू शिल्लक असताना यशस्वीपणे पार केले. जैस्वालने या मोसमात आतापर्यंत 8 सामन्यात 32.14 च्या सरासरीने आणि 157.34 च्या स्ट्राईक रेटने 225 धावा केल्या आहेत.
Web Title: IPL 2024 Yashasvi Jaiswal reaction when meeting Rohit Sharma after match winning ton vs Mumbai Indians RR vs MI Video Viral watch
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.