IPL 2024 : इंडियन प्रीमिअर लीग २०२४ मध्ये चेन्नई सुपर किंग्स ( CSK ) हा सर्वांचा फेव्हरिट राहिला आहे. या संघाचा कर्णधार महेंद्रसिंग धोनी ( MS Dhoni) हा सर्वांच्या गळ्यातील ताईत आहे. ४२ वर्षीय माहिचा हा शेवटचा आयपीएल आहे आणि CSK च्या भविष्याचा विचार करता कॅप्टन कूलने नेतृत्वाची जबाबदारी मराठमोळ्या ऋतुराज गायकवाड ( Ruturaj Gaikwad ) याच्या खांद्यावर सोपवली आहे. ऋतुराजच्या नेतृत्वाखाली चेन्नईने आयपीएल २०२४ मध्ये पाचपैकी ३ सामने जिंकले आहेत आणि त्यांचा पुढील सामना मुंबई इंडियन्सविरुद्ध वानखेडे स्टेडियमवर १४ एप्रिलला होणार आहे.
चेन्नईचा संघ मुंबईत दाखल झाला आहे आणि इथे ऋतुराज व त्याची पत्नी उत्कर्षा यांनी फॅन्सला मराठीतून काही शिकवण्याचा प्रयत्न केला आहे. चेन्नई सुपर किंग्सच्या संघात ऋतुराज, तुषार, शार्दूल आदी अनेक मराठी खेळाडू आहेत. त्यात पुढचा सामना मुंबईत होत असल्याने ऋतुराजने पत्नीसोबत एक मराठी शाळा भरवली आणि त्याचा व्हिडीओ फ्रँचायझीने अपलोड केला आहे. यात दोघंही एकमेकांशी मराठीत काही वाक्य बोलत आहेत आणि त्याचा इंग्रजीत भाषांतरही करून सांगत आहेत. पण, उत्कर्षाने व्हिडीओच्या सुरुवातीलाच तू येडपट आहेस का? असं विचारून सिक्सर मारला. त्यावर ऋतुराज काहीच बोलू शकला नाही.
आयपीएल २०२४ मध्ये राजस्थान रॉयल्स ४ सामन्यांत अपराजित आहेत आणि ते ८ गुणांसह तालिकेत अव्वल आहेत. कोलकाता नाईट रायडर्स, लखनौ सुपर जायंट्स, चेन्नई सुपर किंग्स व सनरायझर्स हैदराबाद यांच्या खात्यात प्रत्येकी ६ गुण आहेत. पण, CSK व SRH यांनी इतरांपेक्षा एक सामना ( ५ ) जास्त खेळला आहे.