IPL मेगा लिलावाआधी दिल्ली कॅपिटल्सच्या संघानं रिषभ पंतला रिलीज करण्याचा निर्णय घेतला. पंत अन् फ्रँचायझी संघात नेमकं काय बिनसलं ते गुलदस्त्यातच आहे. पण ही दिल्ली कॅपिटल्स संघाची एक मोठी चूक ठरू शकते. आता ही चूक भरून काढण्यासाठी या संघाकडे एक आणखी पर्याय उपलब्ध झाला आहे. ७३ कोटी पर्ससह दिल्लीचा संघ आयपीएल मेगा लिलावात उतरेल. याशिवाय संघाकडे दोन RTM पर्याय आहेत. त्यातील एक पर्याय ते डेविड वॉर्नरसाठी वापरु शकतात.
वॉर्नर DC साठी ठरू शकतो कॅप्टन्सीचा एक उत्तम पर्याय, कारण...
डेविड वॉर्नरवर कॅप्टन्सीचा डाव खेळणं हा दिल्ली कॅपिटल्ससाठी एक उत्तम पर्याय ठरू शकतो. यामागचं पहिलं कारण हे की, डेविड वॉर्नर हा आयपीएल चॅम्पियन कॅप्टन आहे. संघाला चॅम्पियन करण्यासाठी कोणत्या गोष्टी करणं गरेजेच आहे, ते त्याला चांगलेच ठाऊक आहे. आयपीएलमध्ये तो दिल्ली कॅपिटल्सकडून खूप सामने खेळला आहे. त्यामुळे या संघाचे नेतृत्व करणं त्याच्यासाठी सोपे टास्क असेल.
दिल्लीच्या संघाकडून वॉर्नरचा रेकॉर्ड
डेविड वॉर्नर दिल्ली कॅपिटल्सकडून एकूण ९१ सामने खेळले आहेत. यात त्याने ३१.३६ च्या सरासरीनं २ शतके आणि २२ अर्धशतकासह २५८२ धावा केल्या आहेत. दिल्ली संघाकडून सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांचत्या यादीत तो दुसऱ्या स्थानावर आहे. कॅप्टन्सीच्या बंदी उठताच वॉर्नर बिग बॅश लीगमध्ये सिडनी थंडर संघाचा कॅप्टन झाला आहे. ही गोष्ट आयपीएलमध्ये त्याच्याकडे कॅप्टन्सीच्या रुपात सकारात्मक दृष्टिकोन निर्माण करणारी ठरू शकते.
डेविड वॉर्नरचा IPL मधील कॅप्टन्सीतील रेकॉर्ड
डेविड वॉर्नरनं २००९ मध्ये दिल्ली डेअरडेविल्स संघाकडून आयपीएलमध्ये पदार्पण केल्याचे पाहायला मिळाले होते. २०१३ मध्ये याच संघाकडून त्याला काही सामन्यात पहिल्यांदा कार्यवाहू कॅप्टनच्या रुपात नेतृत्वाची संधी मिळाली. त्याच्या नेतृत्वाखालील दोन्ही सामन्यात DD आताचा DC संघाला पराभवाचा सामना करावा लागला होता. २०१४ च्या हंगामात तो सनरायझर्स हैदराबादच्या ताफ्यात गेला. २०१५ च्या हंगामात त्याला संघाचे नेतृत्व करण्याची संधी मिळाली. २०१६ मध्ये त्याच्या कॅप्टन्सीतच सनरायझर्स हैदराबादच्या संघाने आयपीएल ट्रॉफी जिंकली होती. ६७ सामन्यात या संघाचे नेतृत्व करताना ३५ विजय आणि ३० पराभव असा वॉर्नरचा रेकॉर्ड आहे. एकंदरीत विचार करता वॉर्नरनं आपल्या कॅप्टन्सीतल ६९ पैकी ३५ सामने जिंकले आहेत. त्याचे विनिंग पर्सेंटेजचा आकडा ५२.१७ असा आहे.