Join us

८ ची सरासरी, ८० चा स्ट्राईक रेट! २७ कोटींची बोली लागलेला रिषभ पंत पुन्हा फ्लॉप, फलंदाजीचा क्रम बदलला पण...

IPL 2025: यंदाच्या आयपीएलसाठी झालेल्या लिलावामध्ये लखनौ सुपरजायंट्सच्या संघाने भारताचा यष्टीरक्षक रिषभ पंत याला तब्बल २७ कोटींची बोली लावून खरेदी केलं होतं. मात्र आयपीएलमधील यशस्वी फलंदाजांपैकी एक असलेल्या रिषभ पंत याला यंदाच्या आयपीएलमध्ये प्रतिष्ठेला साजेशी कामगिरी करता आलेली नाही.

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 13, 2025 13:19 IST

Open in App

यंदाच्या आयपीएलसाठी झालेल्या लिलावामध्ये लखनौ सुपरजायंट्सच्या संघाने भारताचा यष्टीरक्षक रिषभ पंत याला तब्बल २७ कोटींची बोली लावून खरेदी केलं होतं. मात्र आयपीएलमधील यशस्वी फलंदाजांपैकी एक असलेल्या रिषभ पंत याला यंदाच्या आयपीएलमध्ये प्रतिष्ठेला साजेशी कामगिरी करता आलेली नाही.

शनिवारी लखनौ सुपरजायंट्स आणि गुजरात टायटन्स यांच्यात झालेल्या लढतीमध्येही रिषभ पंत अपयशी ठरला आणि अवघ्या २१ धावा काढून बाद झाला. या खेळीदरम्यान, त्याने १८ चेंडूंचा सामना करताना ४ चौकार ठोकले होते. दरम्यान, कालच्या लढतीमधील अपयशामुळे पंत याची निराशाजनक कामगिरी अधोरेखित झाली आहे. नियमित सलामीवीर मिचेल मार्श अनुपलब्ध असल्याने रिषभ पंत सलामीला आला होता. मात्र फलंदाजीचा क्रम बदलल्यानंतरही पंतचं फलंदाजीमधील नशीब बदलू शकलं नाही. फलंदाजीत अपयशी ठरला तरी रिषभ पंतने एडेन मार्क्रमसोबत ३७ चेंडूत ६५ धावांची सलामी देत लखनौ सुपरजायंट्सच्या विजयाची पायाभरणी करण्यात मात्र यश मिळवलं होतं.

यंदाच्या आयपीएलमधील कामगिरीवर नजर टाकल्यास रिषभ पंत सहा सामने खेळला असून, त्यात त्याला अवघ्या ८ च्या सरासरीने केवळ ४० धावाच काढता आल्या आहेत. यादरम्यान,त्याचा स्ट्राईक रेट केवळ ८० एवढा राहिला आहे. रिषभ पंत याला लखनौच्या फ्रँचायझीने मोठी रक्कम मोजून खरेदी केले होते. मात्र त्याच्या कामगिरीमुळे चाहत्यांची निराशा झाली आहे.

यंदाच्या आयपीएलमध्ये रिषभ पंत बॅटने चमक दाखवू शकला नसला तरी त्याच्या नेतृत्वाखाली लखनौ सुपरजायंट्स संघाची कामगिरी मात्र समाधानकारक होत आहे. तसेच काल झालेल्या सामन्यात लखनौ सुपरजायंट्सने गुजरात टायटन्सविरुद्ध ६ विकेट्स राखून दणदणीत विजय मिळवला होता. 

टॅग्स :रिषभ पंतलखनौ सुपर जायंट्स