IPL 2025 Umpires Update: आयपीएल २०२५ स्पर्धेतील १८ व्या हंगामासाठी पंचगिरीसंदर्भातील माहिती समोर आली आहे. २२ मार्च पासून रंगणाऱ्या जगातील सर्वात मोठ्या आणि लोकप्रिय टी-२० लीग स्पर्धेत ७ नवे चेहरे पंच म्हणून दिसणार आहेत. याशिवाय आतापर्यंत आयपीएलच्या १७ हंगामात पंचाच्या भूमिकेत दिसलेले अनिल चौधरी यावेळी नव्या भूमिकेत दिसतील.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
अंपायरिंग पॅनलमध्ये ७ नव्या चेहऱ्यांना संधी
आयपीएल स्पर्धेसाठीच्या अंपायरिंग पॅनलमधील ७ नव्या चेहऱ्यांमध्ये स्वरूपानंद कन्नूर, अभिजीत भट्टाचार्य, पाराशर जोशी, अनीश सहस्त्रबुद्धे, केयूर केलकर, कौशिक गांधी आणि अभिजीत बेंगेरी या पंचांचा समावेश आहे. हे नवे चेहरे अनुभवी पंच एस रवी आणि सीके नंदन यांच्या मार्गदर्शनाखाली स्पर्धेत अंपायरिंग करताना दिसतील.
१७ हंगामात पंचगिरी करणारा चेहरा समालोचन करताना दिसणार
२००८ पासून आयपीएल स्पर्धेला सुरुवात झाली. या स्पर्धेतील पहिल्या हंगामापासून अनिल चौधरी सातत्याने पंचाच्या भूमिकेत दिसले आहेत. पण ६० वर्षीय दिग्गज पंच यंदाच्या हंगामातील अंपायर्स पॅनेलमध्ये दिसणार नाही. यामागचं कारण अनिल चौधरी यांनी या वेळी समालोचन करण्याचा निर्णय घेतलाय. अनिल चौधरी यांनी आपल्या आंतरराष्ट्रीय अंपायरिंगच्या कारकिर्दीत १२ कसोटी, ४९ वनडे आणि ६४ टी-२० सामन्यात पंच म्हणून कामगिरी पाहिली आहे. २०२४ च्या हंगामातील रणजी ट्रॉफी स्पर्धेच्या फायनलनंतर ते शेवटचे पंच म्हणून दिसले होते. आता ते कॉमेंट्री बॉक्समध्ये आपल्या नव्या इनिंगची सुरुवात करतील.
कुमार धर्मसेना यांचा पत्ता कट, परदेशी अंपायर्सपैकी कुणाची लागली वर्णी?
श्रीलंकेचे कुमार धर्मसेना हे प्रसिद्ध पंच आहेत. पण यावेळी आयपीएलमध्ये ते दिसणार नाहीत. यामागचं नेमकं कारण काय ते गुलदस्त्यातच आहे. या चेहऱ्याशिवाय माइकल गॉफ, क्रिस गॅफनी आणि अँड्रियान होल्डस्टॉक यांच्या रुपात ३ आंतरराष्ट्रीय स्तरावरील पंच यंदाच्या हंगामात पंचाच्या भूमिकेत दिसतील.