BCCI New Rules, IPL 2025: जगातील सर्वात श्रीमंत टी२० लीग असलेल्या IPLच्या नव्या हंगामाला २२ तारखेपासून सुरुवात होणार आहे. २२ मार्चला कोलकाता आणि बंगळुरू या दोन संघांच्या सामन्याने स्पर्धेची सुरूवात होणार आहे. या स्पर्धेची सुरुवात होण्याआधीच मोठी बातमी आली आहे. बीसीसीआय एक महत्त्वाचा नियम बदलण्याची शक्यता आहे. IPL मधील सर्व १० संघांच्या कर्णधारांना मुंबईला बोलवले आहे. आयपीएलचा नवीन हंगाम सुरू होण्यापूर्वी सर्व संघांच्या कर्णधारांची बैठक होणार आहे. सहसा ही बैठक पहिला सामना ज्या ठिकाणी असतो, तेथे होते. पण यंदा ही बैठक बीसीसीआय कार्यालयात घेतली जात आहे. त्यामुळे एखादी महत्त्वाची घोषणा बीसीसीआयकडून केली जाण्याची शक्यता आहे. त्यात एक महत्त्वाचा नियम बदलला जाण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
बीसीसीआय बदलणार हा नियम
सर्व कर्णधारांची बैठक २० मार्च रोजी मुंबईतील बीसीसीआय मुख्यालयात होणार आहे. आयपीएल संघांच्या कर्णधारांव्यतिरिक्त, फ्रँचायझींचे व्यवस्थापक देखील या बैठकीला उपस्थित राहतील. शनिवारपासून सुरू होत असलेल्या आयपीएलच्या १८ व्या सत्रात चेंडूवर लाळ लावण्यावरील बंदी उठण्याची शक्यता आहे. बोर्डाने या प्रस्तावावर सविस्तर चर्चा केली आहे. मुंबईत गुरुवारी हा प्रस्ताव सर्व कर्णधारांसमक्ष ठेवण्यात येणार आहे. आयसीसीने कोरोना काळात खबरदारीचा उपाय म्हणून चेंडूला चकाकी आणण्यासाठी वापरात येणाऱ्या लाळेवर बंदी घातली होती. संक्रमणातून पसरण्यात येणाऱ्या कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी हा नियम लागू करण्यात आला होता. मात्र आता कोरोनाची भीती जवळपास संपली आहे. त्यामुळे बीसीसीआय ते 'जुने दिवस' परत आणण्याची शक्यता आहे.
आजच्या बैठकीत काय-काय?
बीसीसीआय आणि आयपीएल व्यवस्थापनाने सर्व फ्रँचायझींना एक ई-मेल पाठवला असून बैठकीसाठी बोलावून घेतले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, ही बैठक सुमारे एक तास चालेल. या काळात, संघांना आगामी हंगामातील बदल आणि नवीन गोष्टींबद्दल माहिती दिली जाईल. या ब्रीफिंगनंतर, स्पॉन्सर्सशी संबंधित ताज हॉटेलमध्ये काही कार्यक्रम आहेत. हे कार्यक्रम चार तास चालतील. यानंतर सर्व कर्णधारांचे फोटोशूट होईल.