BCCI All Captains meet IPL 2025: जगातील सर्वात श्रीमंत टी२० लीग असलेल्या IPLच्या नव्या हंगामाला २२ तारखेपासून सुरुवात होणार आहे. २२ मार्चला कोलकाता आणि बंगळुरू या दोन संघांच्या सामन्याने स्पर्धेची सुरूवात होणार आहे. या स्पर्धेची सुरुवात होण्याआधीच मोठी बातमी आली आहे. बीसीसीआयने IPL मधील सर्व १० संघांच्या कर्णधारांना मुंबईला बोलवले आहे. आयपीएलचा नवीन हंगाम सुरू होण्यापूर्वी सर्व संघांच्या कर्णधारांची बैठक होणार आहे. अहवालानुसार, ही बैठक २० मार्च रोजी मुंबईतीलबीसीसीआय मुख्यालयात होणार आहे. आयपीएल संघांच्या कर्णधारांव्यतिरिक्त, फ्रँचायझींचे व्यवस्थापक देखील या बैठकीला उपस्थित राहतील.
ई-मेल पाठवून बोलावून घेतलं...
बीसीसीआय आणि आयपीएल व्यवस्थापनाने सर्व फ्रँचायझींना एक ई-मेल पाठवला. क्रिकबझच्या मते, ही बैठक सुमारे एक तास चालेल. या काळात, संघांना आगामी हंगामातील बदल आणि नवीन गोष्टींबद्दल माहिती दिली जाईल. या ब्रीफिंगनंतर, स्पॉन्सर्सशी संबंधित ताज हॉटेलमध्ये काही कार्यक्रम आहेत. हे कार्यक्रम चार तास चालतील. यानंतर सर्व कर्णधारांचे फोटोशूट होईल.
अचानक नेहमीपेक्षा वेगळा निर्णय का?
साधारणपणे आतापर्यंत अशा बैठका आणि फोटो सेशन त्याच शहरात होत असत, जिथे पहिला सामना खेळला जाणार आहे. मात्र, यावेळी हा कार्यक्रम बीसीसीआयच्या मुख्यालयात होणार आहे. यावरून असा अंदाज लावला जात आहे की या बैठकीत काही महत्त्वाच्या गोष्टींबाबत चर्चा केली जाऊ शकते. तसेच, IPL नियमांबाबत काही चर्चा होण्याची अपेक्षा आहे.
१० कर्णधारांची घोषणा
सर्वात शेवटी अक्षर पटेलला दिल्ली कॅपिटल्सचा कर्णधार म्हणून नियुक्त करण्यात आले. यासह, दहाही संघांचे कर्णधार निश्चित झाले आहेत. हार्दिक पांड्या (मुंबई इंडियन्स), पॅट कमिन्स (SRH), ऋतुराज गायकवाड (CSK), रजत पाटीदार (RCB), ऋषभ पंत (LSG), श्रेयस अय्यर (पंजाब), संजू सॅमसन (राजस्थान रॉयल्स), अजिंक्य रहाणे (KKR) आणि शुभमन गिल (गुजरात टायटन्स) अशी त्यांची नावे आहेत.