Join us

Retired Out पॅटर्नसह CSK नं केली MI ची कॉपी; रिझल्टही तसाच लागला; PBKS नं सामना जिंकला

पंजाब किंग्ज विरुद्धच्या सामन्यात चेन्नई सुपर किंग्जचा संघ २०० पारच्या लढाईत हतबल ठरला.

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 9, 2025 00:12 IST

Open in App

IPL 2025 Punjab Kings vs Chennai Super Kings, 22nd Match : यंदाच्या हंगामात आयपीएलमधील  सर्वात लोकप्रिय संघांची अवस्था एकदम बिकट झाल्याचे दिसते. मुंबई इंडियन्स पाठोपाठ चेन्नई सुपर किंग्जही विजयासाठी संघर्ष करताना दिसते. मंगळवारी  पंजाब न्यू क्रिकेट असोसिएशनच्या मैदानात रंगलेल्या सामन्यात चेन्नई सुपर किंग्जचा संघ २०० पारच्या लढाईत हतबल ठरला. दुसऱ्या बाजूला श्रेयस अय्यरच्या नेतृत्वाखालील पंजाब किंग्जच्या संघानं घरच्या मैदानात दिमाखात विजय नोंदवला. 

CSK नं २०० चा पल्ला गाठला, पण विजयापासून दूरच

प्रियांश आर्य १०३ (४२) याच्या शतकी  खेळीसह शशांक सिंग ५२ (३६)* आणि मार्को यान्सेन ३४ (१९) यांनी केलेल्या दमदार खेळीच्या जोरावर पंजाबच्या संघानं निर्धारित २० षटकात ६ विकेट्सच्या मोबदल्यात २१९ धावा करत चेन्नईसमोर २२० धावांचे टार्गेट सेट केले होते. या धावांचा पाठलाग करताना चेन्नई सुपर किंग्जचा संघ २०१ धावांपर्यंतच मजल मारू शकला.  चेन्नईकडून डेवॉन कॉन्वे याने सर्वोच्च ६९ धावांची खेळी केली. त्याच्याशिवाय रचिन रवींद्र याने २३ चेंडूत ३६ धावांचे योगदान दिले. कर्णधार ऋतुराज गायकवाड अवघ्या एका धावेवर बादझाला. अखेरच्या षटकात शिवम दुबे ४२ (२७) आणि महेंद्रसिंह धोनी २७ (१२) यांनी फटकेबाजी केली. पण ती संघाच्या विजयासाठी उपयुक्त ठरली नाही. 

CSK नं केली MI ची कॉपी अन् शेवटी सामनाही गमावला

या सामन्यात चेन्नई सुपर किंग्जच्या संघाने मुंबई इंडियन्सची कॉपी केल्याचे पाहायला मिळाले. धावांचा पाठलाग करत असताना  आघाडीचे फलंदाज तंबूत परतल्यावर मैदानात तग धरून खेळणाऱ्या डेवॉन कॉन्वे रिटायर्ड आउट होऊन तंबूत परतला. त्याने ४९ चेंडूत ६९ धावांचे योगदान दिले. आयपीएलमध्ये रिटायर्ड आउट होणारा तो पाचवा खेळाडू ठरला. याआधी मुंबई इंडियन्सच्या संघानं लखनौ विरुद्धच्या सामन्यात तिलक वर्मासंदर्भात असाच निर्णय घेतला होता. तो निर्णय घेऊनही मुंबई इंडियन्सच्या पदरी निराशाच आली होती. चेन्नईच्या बाबतीतही अगदी तसेच घडले.  हा निर्णय घेतल्यावर  शिवम दुबे आणि धोनी यांनी फटकेबाजी करूनही त्यांना विजयाचे लक्ष्य गाठता आले नाही.  

यावेळी MS धोनीचा आक्रमक अंदाज दिसला, पण....

मागील दोन  सामन्यात धावांचा पाठलाग करताना धोनी मैदानात आला, पण तो जिंकण्यासाठी खेळतोय असे वाटलेच नाही. यावेळी त्याने जुने तेवर दाखवून दिले. पंजाब किंग्ज विरुद्धच्या सामन्यात त्याने तुफान फटकेबाजी केली. आयपीएलच्या यंदाच्या हंगामात सर्वात जलदगतीने चेंडू टाकण्याचा विक्रम ज्याच्या नावे आहे त्या लॉकी फर्ग्युसनच्या चेंडूलाही त्याने आसमान दाखवले.  धोनीनं या सामन्यात १२ चेंडूत २२५ च्या स्ट्राइक रेटनं २७ धावा कुटल्या.  त्याच्या भात्यातून १ चौकारासह ३ षटकार पाहायला मिळाले. पण शेवटी चेन्नईच्या पदरी पराभवच आला. अखेरच्या षटकात २८ चेंडूत ६ धावांची गरज होती. या षटकातील यश ठाकूरच्या पहिल्याच चेंडूवर धोनी चहलच्या हाती झेल देऊन बाद झाला. पंजाबनं १८ धावांसह हा सामना जिंकला.  

टॅग्स :इंडियन प्रिमियर लीग २०२५पंजाब किंग्सचेन्नई सुपर किंग्सइंडियन प्रीमिअर लीगमहेंद्रसिंग धोनी