भल्याभल्या गोलंदाजांच्या नाकी नऊ आणणारा ऋषभ पंत यंदाच्या आयपीएलमध्ये फ्लॉप ठरला आहे. लखनौ सुपर जांयट्यकडून खेळताना ऋषभने ९ सामन्यात फक्त १०६ धावा केल्या. त्यामुळे चाहते आणि क्रिकेट तज्ज्ञ हे पंतच्या अपयशामागचे कारण शोधण्याचा प्रयत्न करत आहेत. याच पार्श्वभूमीवर भारताचा अनुभवी कसोटी फलंदाज चेतेश्वर पुराजाच्या खराब फॉर्ममागचे कारण सांगितले आहे.
ईएसपीएनक्रिकेटशी बोलताना पुजारा म्हणाला की, 'कसोटी आणि टी-२० क्रिकेटमध्ये पंतच्या फलंदाजीत खूप फरक आहे. जेव्हा पंत कसोटी सामने खेळतो, तेव्हा त्याच्याकडे विचार करण्यासाठी आणि खेळण्यासाठी जास्त वेळ असतो. त्याला माहित आहे की, गोलंदाज त्याला बाद करण्याचा प्रयत्न करत आहेत. कसोटी क्रिकेटमध्ये वेगळ्या पद्धतीचे क्षेत्ररक्षण असते, स्लिपमध्ये खेळाडू असतात. ज्यामुळे त्याला खेळण्यासाठी गॅप मिळतो. पण टी-२० क्रिकेट त्यापेक्षा फार वेगळे आहे. त्यामुळे पंतला टी-२० क्रिकेटमध्ये संघर्ष करावा लागत आहे.'
पुढे पुजारा म्हणाला की, 'कसोटी क्रिकेटमध्ये धावा करण्यासाठी बरीच जागा असते. टी-२० क्रिकेटमध्ये तसे नसते. जेव्हा पंत चौथ्या, पाचव्या क्रमांकावर किंवा त्यानंतर फलंदाजीसाठी येतो, तेव्हा चेंडू थोडा मऊ झालेला असतो. दुसरा संघ त्याच्यासाठी एक खास मैदान तयार करतो. त्यामुळे, कसोटीतील त्याच्या फलंदाजीची तुलना टी-२० मधील फलंदाजीशी करणे खूप कठीण आहे.'
'कर्णधारपदाबद्दल बोलायचे झाले तर, मला वाटते की, ऋषभ पंतकडे खेळाडूंना समजून घेण्याची क्षमता इतरांच्या तुलनेत कमी आहे. यावरून हे स्पष्ट होते की, फलंदाज आणि कर्णधार म्हणून पंतची मानसिक वृत्ती टी-२० मधील त्याच्या कामगिरीवर परिणाम करू शकते', असेही पुजारा म्हणाला.
आयपीएल २०२५ मध्ये एलएसजीसाठी ऋषभ पंतची कामगिरी आतापर्यंत खूपच निराशाजनक राहिली. त्याने ९ सामन्यांमध्ये ८ वेळा फलंदाजी केली आहे आणि फक्त १०६ धावा केल्या. त्याची सरासरी १३.२५ आहे आणि स्ट्राईक रेट फक्त ९६.३६ आहे. त्याने चेन्नई सुपर किंग्जविरुद्ध ६३ धावांची चांगली खेळी खेळली. मागील काही सामन्यांमधील पंतची कामगिरी पाहता तो फॉर्मसाठी संघर्ष करत असल्याचे दिसून येत आहे.