MS Dhoni Quick Stumping Faster Than Light : चेन्नई सुपर किंग्जचा माजी कर्णधार आणि स्टार विकेट किपर बॅटर महेंद्रसिंह धोनी याने पुन्हा एकदा आपल्या अफलातून यष्टीरक्षकाने सर्वांचे लक्ष वेधून घेतलं आहे. पहिल्या सामन्यात डोळ्याची पापणी लवण्या आत सूर्यकुमार यादवला तंबूचा रस्ता दाखवणाऱ्या धोनीनं सलग दुसऱ्या मॅचमध्ये तसाच तोरा दाखवत सेट झालेल्या फिल सॉल्टला तंबूचा रस्ता दाखवला. फिल सॉल्ट क्रिजच्या अगदी किंचित बाहेर आला होता, पण धोनीनं पुन्हा एकदा आपल्यातील वेग दाखवून आरसीबीच्या संघाला पहिला धक्का दिला. त्याची स्टंपिंग बघून नॉन स्ट्राइकवर असलेला विराट कोहलीही स्तब्ध झाला.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
सॉल्ट किंचित पुढे गेला, पण धोनीनं त्याला मागे काही वळू दिले नाही
चेपॉकच्या मैदानात रंगलेल्या सामन्यात टॉस जिंकून ऋतुराज गायकवाडनं पहिल्यांदा गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. फिल सॉल्ट आणि विराट कोहली या जोडीनं आरसीबीच्या डावाची सुरुवात केली. एका बाजूला विराट कोहली संयमी अंदाजात खेळत असताना फिल सॉल्टनं चेन्नईच्या गोलंदाजांची धुलाई सुरु केली होती. पॉवर प्लेमध्ये त्याची फटकेबाजी सुरु असतान नूर अहमद गोलंदाजीला आला अन् त्याच्या गोलंदाजीवर धोनीनं विकेटमागे पुन्हा एकदा यष्टीमागील चपळतेचा सर्वोत्तम नजराणा दाखवून देत संघाला पहिलं यश मिळवून देण्यात महत्त्वाची भूमिका बजावली.
MS Dhoni Quick Stumping : ...अन् MS धोनीनं ०.१२ सेकंदात सूर्या भाऊचा खेळ केला खल्लास! (VIDEO)
MS धोनीचा DRS चा निर्णय फसला, पण यष्टीमागे स्टंपिंगचा तोरा दिसला
महेंद्रसिंह धोनी वयाच्या ४३ व्या वर्षी यष्टीमागे जी कामगिरी करुन दाखवतोय ती थक्क करून सोडणारी आहे. एखाद्या युवा यष्टीरक्षकालाही जमणार नाही ते धोनी सातत्याने करून दाखवताना दिसतंय. या सामन्यात खलिल अहमदच्या गोलंदाजीवर त्याने कोहलीच्या विकेटसाठी रिव्ह्यू घेतल्याचे पाहायला मिळाले. धोनी रिव्ह्वू घेतो त्यावेळी अंपायरला निर्णय बदलावा लागतो, हे अनेकदा पाहायला मिळाले आहे. पण कोहलीबाबत ते घडलं नाही. रिव्ह्यूचा निर्णय फसला पण विकेटमागे त्याने मोठा डाव साधत आरसीबीला मोठा धक्का दिला.