आयपीएल मध्ये शनिवारी झालेल्या पहिल्या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाने गतविजेत्या कोलकाता नाईट रायडर्सचा पराभव करत विजयी सलामी दिली होती. या सामन्यात कृणाल पांड्यांच्या भेदक गोलंदाजीनंतर फिल सॉल्ट, विराट कोहली आणि कर्णधार रजत पाटीदार यांची तुफानी फलंदाजी आरसीबीच्या विजयात महत्त्वाची ठरली होती. दरम्यान, या सामन्यावेळी घडलेली एक घटना आता चर्चेचा विषय ठरली आहे. त्याचं झालं असं की, बंगळुरूच्या फलंदाजीदरम्यान, विराट कोहलीचं अर्धशतक पूर्ण झाल्यावर एक चाहता मैदानात घुसला. त्यानं विराट कोहलीचं अभिनंदन करत त्याची गळाभेटही घेतली. मात्र आता या कृत्याची जबर किंमत या चाहत्याला मोजावी लागली आहे.
कोलकाता नाईट रायडर्सने दिलेल्या १७५ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना फिल सॉल्ट आणि विराट कोहलीने बंगळुरूला जोरदार सुरुवात करून दिली होती. दरम्यान, विराट कोहलीने १३व्या षटकात आपलं अर्धशतक पूर्ण केलं. प्रेक्षकांकडून टाळ्यांच्या कडकडाटात त्याचं कौतुक केलं. याचवेळी ईडन गार्डनवरील कडेकोट बंदोबस्त भेदत विराट कोहलीचा एक चाहता मैदानात घुसला. सुरक्षा रक्षकांना हुलकावणी देत तो थेट विराट कोहलीपर्यंत पोहोचला. त्याने त्याचं अभिनंदन केलं. तसेच त्याची गळाभेट घेतली. एवढंच नाही तर तो विराट कोहलीच्या पाया पडला.
तोपर्यंत सुरक्षा रक्षक खेळपट्टीवर दाखल झाले. त्यांनी या तरुणाला पकडून मैदानाबाहेर नेले. त्यानंतर कोलकाता पोलिसांनी या प्रकाराची गंभीर दखल घेत या तरुणाला ताब्यात घेतले. तसेच या तरुणाविरोधात कलम ३२९ अन्वये गुन्हाही दाखल करण्यात आला असून, आता या तरुणावर अटकेची कारवाई करण्यात आल्याची माहिती समोर येत आहे.
ईडन गार्डनवर सामना सुरू असताना क्रिकेटप्रेमींनी सुरक्षा व्यवस्था भेदल्याच्या घटना आधीही घडलेल्या आहेत. मात्र आजची घटना ही आयपीएलमधील पहिल्याच सामन्या घडल्याने त्याची चर्चा अधिक होत आहे. दरम्यान, कोलकाता पोलीस आणि क्रिकेट असोसिएशन ऑफ बंगालने याबाबत सक्त भूमिका घेतली आहे. हा तरुण एवढी कडेकोट सुरक्षा व्यवस्था भेदून थेट खेळपट्टीपर्यंत कसा काय पोहोचला, याचा तपास आता पोलीस करत आहेत.