संघात ऐकापेक्षा एक तडाखेबाज असतानाही सनरायझर्स हैदराबादच्या संघाला यंदाच्या हंगामात काही खास कामगिरी करता आली नाही. हैदराबादचा संघ त्यांचा पुढील सामना १७ एप्रिल रोजी मुंबई इंडियन्सविरुद्ध खेळणार आहे. मात्र, त्यापूर्वीच संघाशी संबंधित धक्कादायक माहिती समोर आली. हैदराबादचा संघ ज्या हॉटेलमध्ये थांबला होता, त्या हॉटेलला आग लागल्याची घटना घडली. सुदैवाने, सर्व खेळाडू सुरक्षित असून संघाला दुसऱ्या हॉटेलमध्ये हलवण्यात आले. ही घटना सोमवारी सकाळी घडली.
सनरायझर्स हैदराबादचा संघ हैदराबादमधील बंजारा हिल्स येथील पार्क हॉटेलमध्ये थांबला होता. एनडीटीव्हीच्या वृत्तानुसार, या हॉटेलच्या एका मजल्यावर आज सकाळी आग लागली. या आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी दाखल होऊन आगीवर नियंत्रण मिळवले. आगीमुळे हॉटेल आणि परिसरात धुराचे लोट पसरले. हॉटेलमध्ये आग लागल्याचे समजताच हैदराबादच्या संघाला दुसऱ्या हॉटेलमध्ये शिफ्ट करण्यात आले.
या हंगामात हैदराबादची कामगिरी आतापर्यंत निराशाजनक राहिली आहे. हैदराबादने ६ सामने खेळले आहेत. यातील दोन सामन्यात त्यांना यश मिळाले आहे. तर, चार सामन्यांमध्ये त्यांना पराभवाचा सामना करावा लागला. हैदराबादने राजस्थान रॉयल्स आणि पंजाब किंग्जचा पराभव केला. हैदराबादला लखनौ सुपर जायंट्स, कोलकाता नाइट रायडर्स आणि गुजरातविरुद्ध पराभवाचा सामना करावा लागला. हैदराबादच्या संघाने गेल्या सामन्यात उत्तम उनरागमन केले. तडाखेबाज फलंदाज अभिषेक शर्माच्या वादळी शतकाच्या जोरावर हैदराबादने पंजाबचा दणदणीत पराभव केला.