Join us

RCB vs GT : ...अन् किंग कोहलीला रोखण्यासाठी प्रिन्स शुबमन गिलनं खेळलेला डाव ठरला यशस्वी

RCB च्या डावात पॉवर प्लेममध्ये गिलनं धाडसी निर्णयासह खेळला मोठा डाव, अन् मिळाली विराट विकेट

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 3, 2025 00:48 IST

Open in App

IPL 2025 GT vs RCB Who Is Arshad Khan? Dismissed Virat Kohli  : आयपीएलच्या यंदाच्या हंगामात सलग दोन विजयासह धमाकेदार सुरुवात करणाऱ्या आरसीबीच्या संघावर घरच्या मैदानात पराभवाचा सामना करावा लागला. टीम इंडियाचा प्रिन्स शुबमन गिल याच्या नेतृत्वाखालील गुजरात टायटन्सच्या संघानं एम.चिन्नास्वामी स्टेडियमवर रंगलेल्या सामन्यात ८ विकेट्स राखून दिमाखदार विजय नोंदवला. गुजरात संघाकडून गोलंदाजीत मोहम्मद सिराजसह साई किशोरनं खास छाप सोडली. मग धावांचा पाठलाग करताना जोस बटलर आणि साई सुदर्शन या दोघांनी मैफिल लुटली. 

RCB च्या डावात पॉवर प्लेममध्ये गिलनं धाडसी निर्णयासह खेळला मोठा डाव

या सामन्यात शुबमन गिलनं किंग कोहलीला रोखण्यासाठी खेळलेला डावही यशस्वी ठरला. आरसीबी विरुद्धच्या सामन्यात रबाडा उपलब्ध नसल्यामुळे त्याची जागा भरून काढण्यासाठी शुबमन गिलनं अर्शद खानला प्लेइंग इलेव्हनमध्ये संधी दिली. एवढेच नाही तर पंजाब विरुद्धच्या मागच्या मॅचमध्ये एका षटकात २१ धावा खर्च करणाऱ्या अर्शद खानवर भरवसा दाखवला. पॉवर प्लेमध्ये कोहली आणि सॉल्ट ही जोडी असताना अर्शदच्या हाती चेंडू सोपवण हा एक मोठा निर्णय होता. 

 'विराट' विकेटसह अर्शद खाननं कॅप्टन शुबमन गिल विश्वास ठरवला सार्थ  घरच्या मैदानात खेळताना कोहलीनं सिराजच्या गोलंदाजीवर चौकार मारून खाते उघडले होते. दुसऱ्या षटकात अर्शद गोलंदाजीला आला. त्याच्या षटकातील पहिल्या चेंडूवर कोहलीनं २ धावा घेतल्या. त्यानंतर कोहलने दोन चेंडू निर्धाव खेळले. चौथ्या चेंडूवर अर्शद खाननं आखूड टप्प्याचा शरीरालगत टाकलेला चेंडू पुल करताना कोहली फसला. प्रसिद्ध कृष्णानं त्याचा झेल टिपला अन् मैदानात शांतता पसरली. कोहलीची ही विकेट शुबमन गिलच्या धाडसी निर्णयाचा एक नमुनाच होती. प्रसिद्ध कृष्णा आणि इशांत शर्मासारखे अनुभवी गोलंदाज असताना विराटला रोखण्यासाठी त्याने अर्शदवर डाव लावला. तो यशस्वीही ठरला.   

कोण आहे अर्शद खान?

अर्शद खान हा एक ऑलराउंडर आहे. गोलंदाजीसह फलंदाजीमध्येही तो उपयक्त कामगिरी करण्याची क्षमता असणारा खेळाडू आहे. २०२२ च्या लिलावात मुंबई इंडियन्सच्या संघानं  २० लाख रुपयांसह त्याला आपल्या ताफ्यात सामील करून घेतले होते. दुखापतीमुळे तो या हंगामात खेळला नाही.  २०२३ च्या हंगामात पदर्पण करताना ६ सामन्यात त्याने ५ विकेट्स घेतल्या. पण तो महागडाही ठरला होता. गत हंगामात तो लखनौच्या ताफ्यात  होता. या हंगामातही त्याला अपेक्षित कामगिरी करता आली नव्हती. पण दिल्ली कॅपिटल्स विरुद्धच्या सामन्यात त्याने ३३ चेंडूत केलेली ५८ धावांची नाबाद खेळी लक्षवेधी ठरली. गुजरातच्या संघानं मेगा लिलावात त्याच्यावर मोठा डाव लावला. १.३ कोटी रुपयांसह त्यांनी या अष्टपैलू खेळाडूला आपल्या ताफ्यात सामील करून घेतले आहे. 

टॅग्स :इंडियन प्रिमियर लीग २०२५रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरगुजरात टायटन्सशुभमन गिलविराट कोहली