मुंबई इंडियन्स आणि सनरायजर्स हैदराबाद यांच्यात बुधवारी (२३ एप्रिल २०२५) आयपीएलचा ४१ वा सामना खेळला गेला. या सामन्यात कर्णधार हार्दिक पांड्याच्या नेतृत्वाखाली मुंबईच्या संघाने दमदार कामगिरी केली आणि हैदराबादला ७ विकेट्सने पराभवाची धूळ चाखली. या हंगामात निराशाजनक कामगिरीने सुरुवात करणारा मुंबईचा संघ विजयीरथावर स्वार झाला आहे. मुंबईने सलग चार सामन्यात विजय मिळवत गुणतालिकेत तिसऱ्या क्रमांकावर झेप घेतली. ही मुंबईकरांसाठी आनंदाची गोष्ट आहे. नुकताच हार्दिक पांड्या आणि संघाचे मुख्य प्रशिक्षक महेला जयवर्धने यांच्यातील संभाषणाचा व्हिडीओ एक समोर आला, ज्यात हार्दिक पांड्या काहीतरी कारणांमुळे नाराज असल्याचे दिसत आहे.
मुंबई आणि हैदराबाद यांच्यात हैदराबादमधील राजीव गांधी आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर सामना खेळला गेला. या सामन्याआधी सर्व खेळाडू आणि प्रेक्षकांनी पहलगाममध्ये झालेल्या भ्याड हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्यांना श्रद्धांजली वाहली. या सामन्यात सर्व खेळाडू हातावर काळी पट्टी बांधून मैदानात उतरले. हा सामना सुरू होण्याआधीचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडीओत हार्दिक पांड्या त्याच्याच संघाचे प्रशिक्षक महेला जयवर्धनेशी वाद घालताना दिसत आहे. हार्दिक पांड्या जयवर्धनेशी नेमके काय बोलत आहे? हे स्पष्ट ऐकू येत नाही. परंतु, त्याच्या बोलण्यावरून तो नाराज असल्याचे दिसत आहे.
हैदराबादविरुद्धच्या सामन्यात हार्दिक पांड्याने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर मुंबईचा वेगवान गोलंदाज ट्रेंट बोल्टच्या भेदक गोलंदाजीच्या जोरावर संघाने हैदराबादला १४३ धावांवर रोखले. हैदराबादकडून हेनरिक क्लासेनने ७१ धावांची खेळी केली. हैदराबादने दिलेल्या लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी मैदानात उतरलेल्या मुंबईच्या संघाने सहा विकेट्स राखून हा सामना जिंकला. मुंबईकडून बोल्टने चार षटकात २६ धावा देऊन सर्वाधिक चार विकेट्स घेतल्या, ज्यामुळे त्याला सामनावीर म्हणून सन्मानित करण्यात आले.