भारतीय संघातील अष्टपैलू खेळाडू हार्दिक पांड्या आता आयपीएल हंगामासाठी सज्ज आहे. यंदाच्या हंगामातील पहिल्या सामन्याला तो मुकणार असला तरी त्यानंतर तोच या संघाचे नेतृत्व करताना दिसणार आहे. गुजरातच्या संघाला चॅम्पियन केल्यावर हार्दिक पांड्यानंमुंबई इंडियन्सच्या संघात घरवापसी केली. गत हंगामात मुंबई इंडियन्सच्या संघात रोहितची जागा घेत कर्णधार झाल्यावर तो तुफान ट्रोल झाला. एवढेच नाही तर त्याच्या वैयक्तिक आयुष्यातही वादळ आलं. ज्या नताशासोबत दोन वेळा लग्न केलं तिच्यासोबतचा संसार मोडला.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
वेळ फिरली पण त्याने हिंमत नाही हारली
हे सगळं घडल्यावरही हार्दिक पांड्या ढळला नाही. वेळ फिरली पण त्याने हिंमत नाही हारली. आजूबाजूला नकारात्मक गोष्टी घडत असताना हार्दिक पांड्याला सावरण्यासाठी फक्त एक गोष्ट पुरेशी ठरली. खुद्द हार्दिक पांड्यानेच एका मुलाखतीमध्ये यासंदर्भातील माहिती शेअर केलीये.
क्रिकेट हा माझा सच्चा मित्र, असं का म्हणाला पांड्या
आयपीएलच्या यंदाच्या हंगामाआधी हार्दिक पांड्याची एक मुलाखत चर्चेत आहे. ज्यात त्याने प्रबळ इच्छाशक्ती आणि स्वत:ला मजबूत ठेवण्यासाठी काय केलं ते सांगितले आहे. तो म्हणाला आहे की, मी कधीही मैदानात सोडण्याचा विचार मनात आणत नाही. ही गोष्ट मला अधिक मजबूत करते. आजूबाजूला काहीही घडू देत क्रिकेट हा खरा मित्र आहे ते विसरत नाही. कारण हीच गोष्ट मला पुढे घेऊन जाणार आहे. अशा आशयाच्या शब्दांत हार्दिक पांड्यानं क्रिकेटला आयुष्यात महत्त्वाचे स्थान असल्याचे सांगितले आहे.
अडीच महिन्यांत सर्व बदललं
हार्दिक पांड्या म्हणाला की, मी सातत्याने मेहनत घेत राहिलो. कठोर परिश्रमाचे फळं मिळाले. टी-२० वर्ल्ड कप जिंकला अन् पुन्हा सगळं अगदी ३६० अंश डिग्रीमध्ये फिरलं. जिद्द, प्रामाणिक प्रयत्न आणि सर्वोच्च कामगिरीसह सर्व ठिक होईल, असे वाटत होते. पण पुढे काय होईल याची कल्पना नव्हती. माझ्या बाबतीत फक्त अडीच महिन्यात सर्व बदलले, असे सांगत त्याने वाईट काळातून सावरल्याची गोष्ट शेअर केली आहे.