Jasprit Bumrah Comeback Mumbai Indians IPL 2025: मुंबई इंडियन्स संघाच्या यंदाच्या हंगामाची सुरुवात फारशी चांगली झालेली नाही. पहिल्या ४ पैकी ३ सामन्यात त्यांना पराभवाचा सामना करावा लागला. आता ७ एप्रिलला मुंबई इंडियन्सचा सामना त्यांच्या घरच्या मैदानावर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूशी होईल. पण त्याआधी चांगली गोष्ट म्हणजे बुमराह संघात सामील झाला आहे. तथापि, बुमराह आरसीबीविरुद्ध मुंबई इंडियन्सच्या प्लेइंग इलेव्हनचा भाग होऊ शकेल की नाही याबद्दल अजूनही सस्पेन्स आहे.
बुमराह पहिला सामना कधी खेळणार?
पाठीच्या शस्त्रक्रियेनंतर जसप्रीत बुमराह बीसीसीआयच्या सेंटर ऑफ एक्सलन्स येथे तंदुरुस्त होत होता. त्याच्या फिटनेसबाबतच्या एका अहवालात म्हटले आहे की त्याच्या पुनरागमनाबद्दल अजूनही साशंकता आहे. पण आता बातमी आली आहे की बुमराह मुंबई इंडियन्सच्या ताफ्यात सामील झाला आहे. बुमराह सामना खेळणार आहे की नाही याबद्दल कोणतीही अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही. पण तो उद्याचा सामना खेळला नाही तरी १३ एप्रिलला दिल्ली कॅपिटल्सविरुद्धचा सामना खेळू शकतो असे मानले जात आहे.
ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर झाली दुखापत
या वर्षी ४ जानेवारी रोजी बॉर्डर-गावस्कर ट्रॉफी दरम्यान सिडनी कसोटीत बुमराह पुन्हा एकदा दुखापतग्रस्त झाला. त्या दुखापतीमुळे बुमराह चॅम्पियन्स ट्रॉफीमधूनही बाहेर पडला. २०१३ पासून जसप्रीत बुमराह हा मुंबईच्या वेगवान गोलंदाजीचा भाग आहे. तेव्हापासून त्याने मुंबई इंडियन्ससाठी १३३ सामने खेळले असून १६५ विकेट्सही घेतल्या आहेत. पाठीच्या दुखापतीमुळे बुमराह IPL 2023 मध्ये खेळू शकला नव्हता. जसप्रीत बुमराहला IPL 2025 साठी मुंबई इंडियन्सने १८ कोटी रुपयांना कायम ठेवले.