IPL 2025 KKR vs LSG 21st Match : ईडन गार्डन्सच्या मैदानात रंगलेल्या कोलकाता विरुद्धच्या सामन्यात लखनौच्या आघाडीच्या फलंदाजांनी धमाकेदार शो दाखवला. एडन मार्करम २८ चेंडूत ४७ धावा करून माघारी फिरल्यावर मिचेल मार्श आणि निकोलस पूरन यांनी तुफान फटकेबाजी केली. दोघांनी ८० पेक्षा अधिक धावा केल्या. या तिघांच्या दमदार खेळीच्या जोरावर LSG च्या संघानं निर्धारित २० षटकात ३ विकेट्सच्या मोबदल्यात २३८ धावा करत केकेआरसमोर २३९ धावांचे आव्हान ठेवले आहे. आयपीएलच्या आतापर्यंतच्या इतिहासातील लखनौच्या संघाची ही दुसऱ्या क्रमांकाची सर्वोच्च धावंसंख्या आहे. याआधी २०२३ च्या हंगामात लखनौच्या संघानं पंजाब किंग्ज विरुद्ध ५ बाद २५७ धावसंख्या उभारली होती.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
मिचेल मार्शनं आधी मार्करम अन् मग पूरनसोबत केली अर्धशतकी भागीदारी
लखनौच्या संघाच्या डावाची सुरुवात करताना मार्करम आणि मिचेल मार्शनं पहिल्या विकेटसाठी ९९ धावांची भागीदारी रचली. मार्करम २८ चेंडूत ४७ धावा करून माघारी फिरल्यावर मिचेल मार्शनं यंदाच्या हंगामातील आणखी एका अर्धशतकाला गवसणी घातली. त्याने ४८ चेंडूत ६ चौकार आणि ५ षटकाराच्या मदतीने १६८.७५ च्या स्ट्राइक रेटनं ८१ धावा ठोकल्या. पूरनसोबत त्याने दुसऱ्या विकेटसाठी ७१ धावांची भागीदारी रचली.
KKR vs LSG : चल नीघ! मार्करमला 'क्लीन बोल्ड' केल्यावर हर्षित राणाने दाखवले तेवर (VIDEO)
मिचेल मार्शकडे ऑरेंज कॅप आली, ती डोक्यावर घालून मिरवण्याआधी पूरननं पुन्हा ती आपल्याकडे घेतली
यंदाच्या हंगामात पहिल्या सामन्यापासून फार्मात असलेल्या निकोलस पूरन याने आपल्या धमाकेदार कामगिरीचा सिलसिला कायम ठेवला. तो मैदानात उतरण्याआधी मिचेल मार्शनं यंदाच्या हंगामातील सर्वाधिक धावा करणाऱ्या यादीत पूरनला ओव्हरटेक केल्याचे पाहायला मिळाले. पण पूरन आला अन् पुन्हा नंबर वनसह त्याने ऑरेंज कॅप आपल्याकडे घेतली. निकोलस पूरन याने कोलाकाता विरुद्धच्या सामन्यात ३६ चेंडूत ७ चौकार आणि ८ षटकाराच्या मदतीने २४१.६७ च्या स्ट्राइक रेटनं नाबाद ८७ धावा कुटल्या.