IPL 2025 Reschedule KKR vs LSG Match : इंडियन प्रीमियर लीग (IPL 2025) स्पर्धेतील १८ व्या हंगामातील सलामीच्या लढतीवर पावसाचे सावट आहे. त्यात आता कोलकाताच्या मैदानातील आणखी एक सामना दुसऱ्या ठिकाणी स्थलांतिरत करण्यात येणार असल्याची आल्याची माहिती समोर येत आहे. सुरक्षिततेच्या कारणास्तव आधी ठरलेल्या नियोजनात बदल करण्याची वेळ बीसीसीआय आणि आयपीएल आयोजकांवर आली आहे. त्यामुळे घरच्या मैदानातील सामना खेळण्यासाठी केकेआरच्या ताफ्याला "काय झाडी काय डोंगर..." गाणं म्हणत गुवाहाटीला जाण्याची वेळ येणार आहे.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
कोलकाताच्या मैदानात रंगणारा सामना गुवाहाटीत होणार
६ एप्रिल रोजी कोलकाता येथील ईडन गार्डन्सच्या मैदानात कोलकाता नाईट रायडर्स (KKR) विरुद्ध लखनौ सुपर जाएंट्स (LSG) यांच्यातील सामना खेळवण्यात येणार होता. पण सुरक्षिततेच्या कारणास्तव हा सामना आता गुवाहाटीच्या मैदानात रंगणार आहे. रामनवमीचा उत्सव असल्यामुळे कोलकाता पोलिस प्रशासनाला स्टेडियमसह दोन्ही फ्रँचायझी संघातील खेळाडूंना सुरक्षा पुरवणे सोयीचं नसल्यामुळे या सामन्याचे ठिकाण बदलण्याची वेळ आली आहे.
१० संघ, ६५ दिवसांत रंगणार ७४ सामने
गत हंगामाप्रमाणेच यंदाच्या वर्षीही आयपीएलच्या रणसंग्रामात १० संघ मैदानात उतरणार आहेत. देशातील १३ वेगवेगळ्या मैदानात रंगणाऱ्या स्पर्धेत ६५ दिवसांच्या काळात एकूण ७४ सामने खेळवण्यात येणार आहेत. २२ मार्चला कोलकाताच्या ईडन गार्डन्सच्या मैदानात गत चॅम्पियन कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु यांच्यातील लढतीने या स्पर्धेचा शुभारंभ होणार आहे. पण या सामन्यावरही पावसाचे सावट निर्माण झाले आहे.
स्नेहाशीष गांगुलींनी सामना घरच्या मैदानावरच खेळवण्यासंदर्भात प्रयत्न केले, पण..
बंगाल क्रिकेट असोसिएशनचे (CAB) अध्यक्ष स्नेहाशीष गांगुली यांनी गुरुवारी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले की, हा सामना शहराबाहेर खेळवला जाऊ नये, असेच आम्हाला वाटत होते. इथंच सामना व्हावा यासाठी बीसीसीआयला विनंती केली. पण ते शक्य नसल्यामुळे सामना स्थलांतरित करण्याचा निर्णय घेण्यात येणार आहे, असे समजते. यासंदर्भात शहर पोलिसांशी चर्चा केली आहे. पण त्या दिवशी आवश्यक सुरक्षा पुरवणे पोलिस प्रशासनाला शक्य नाही, असेही स्नेहाशीष गांगुलींनी म्हटले आहे. आयपीएल किंवा बीसीसीआयकडून अद्याप अधिकृतरित्या यासंदर्भात कोणताही माहिती देण्यात आलेली नाही.