आयपीएलमध्ये मंगळवारी रात्री पंजाब किंग्स आणि कोलकाता नाईटरायडर्सं यांच्यात झालेल्या लढतीचा निकाल अतिशय धक्कादायक लागला. या लढतीत अवघ्या ११२ धावांच्या आव्हानाचा बचाव करताना पंजाब किंग्सने गतविजेत्या कोलकाता नाईटरायडर्सला १६ धावांनी पराभूत केले. प्रथम फलंदाजी करणाऱ्या पंजाबला १११ धावांत गुंडाळल्यानंतर माफक लक्ष्याचा पाठलाग करताना कोलकाता नाईटरायडर्सचा डाव अवघ्या ९५ धावांवर आटोपला. सहज विजय मिळवता येईल असे वाटत असताना फलंदाजांनी केलेल्या हाराकिरीमुळे झालेल्या पराभवामुळे कोलकाता नाईटरायडर्सचा कर्णधार अजिंक्य रहाणे कमालीचा नाराज झाला आहे. तसेच पराभवाची जबाबदारी स्वीकारताना आता बोलण्यासारखं काही उरलं नाही, असं विधान केलं आहे. तसेच आपली विकेट लढतीतील टर्निंग पॉईंट ठरला, असेही अजिंक्य रहाणे म्हणाला.
२० षटकांत अवघ्या ११२ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करण्यास यश न आल्याने निराश झालेला अजिंक्य रहाणे म्हणाला की, आम्ही खूप वाईट फलंदाजी केली. मी या पराभवाची जबाबदारी स्वीकारतो. मी एक चुकीचा फटका खेळला, असे रहाणेने सांगितले.
पंजाब आणि कोलकाता यांच्यातील सामना निर्णायक स्थितीत असताना अजिंक्य रहाणे युझवेंद्र चहलच्या गोलंदाजीवर पायचित झाला होता. रिप्लेमध्ये हा चेंडू ऑफ स्टंपच्या बाहेरून जात असल्याचे दिसून आले. मात्र रहाणेने डीआरएस घेतला नाही. जर डीआरएस घेतला असता तर रहाणे नाबाद ठरला असता. या निर्णयाबाबत त्याने सांगितले की, तो चेंडू स्टंप सोडून जाईल, याबाबत माझ्या मनात खात्री नव्हती. मात्र नंतर सामन्याला कलाटणी मिळण्यास तिथूनच सुरुवात झाली. खरंतर त्यावेळी कुणीही जोखीम घेण्यास तयार नव्हतं. मलाही मी नाबाद असल्याची खात्री नव्हती. त्यामुळे मी डीआरएस घेतला नाही.
मात्र या लढतीत गोलंदाजांनी केलेल्या कामगिरीचं मात्र अजिंक्य रहाणेनं कौतुक केलं. तो म्हणाला की, आमच्या गोलंदाजांनी पंजाबसारख्या भक्कम फलंदाजीच्या फळीसमोर खूप चांगली कामगिरी केली. मात्र फलंदाजीमध्ये आम्ही बेफिकिरी दर्शवली. आता संपूर्ण संघाने याती जबाबदारी स्वीकारली पाहिजे, असेही अजिंक्य रहाणेनं सांगितलं. स्पर्धेतील पुढील लढतींबाबत तो म्हणाला की,अजूनही आपण सकारात्मक विचार केला पाहिजे. अर्धी स्पर्धा अद्याप बाकी आहे. त्यामुळे आता त्यावर लक्ष देऊन वाटचाल करावी लागेल.