गत आयपीएल चॅम्पियन कोलकाता नाईट रायडर्सं संघानं घरच्या मैदानातून रॉयल चॅलेंजर्स विरुद्धच्या लढतीनं यंदाच्या हंगामाची सुरुवात केली. या सामन्यात कोलकाता नाईट रायडर्सचा कर्णधार अजिंक्य रहाणेनं टॉस गमावला. पण त्याने कडक फटकेबाजीनं ईडन गार्डन्सच्या मैदानात धमाका केला. कोलकाताच्या डावातील ९ व्या षटकातील पहिल्याच चेंडूवर षटकार खेचत अजिंक्य रहानेनं २५ चेंडूत अर्धशतकाला गवसणी घातली. आयपीएलच्या यंदाच्या हंगामातील पहिलं अर्धशतक त्याच्या भात्यातून येईल, अशी कदाचित कुणी कल्पनाही केली नसेल, पण हा डाव अजिंक्यनं साध्य केला.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
आक्रमक अंदाजात बॅटिंग, फक्त २५ चेंडूत साजरी केली फिफ्टी
नाणेफेक गमावल्यावर पहिल्यांदा फलंदाजी करताना कोलकाता संघाची सुरुवात खराब झाली. पहिल्याच षटकात अवघ्या ४ धावांवर क्विंटन डिकॉकच्या रुपात संघाला पहिला धक्का बसला. त्याची जागा घेण्यासाठी आलेल्या अजिंक्य रहाणेनं कर्णधाराला साजेसा खेळ करत आक्रमक अंदाजात फटकेबाजी केली. अर्धशतकी खेळीनंतर क्रुणाल पांड्याच्या गोलंदाजीवर एक मोठा फटका मारण्याच्या नादात तो बाद झाला. पण बाद होण्याआधी त्याने ३१ चेंडूत ६ चौकारण आणि ४ षटकाराच्या मदतीने RCB च्या गोलंदाजांचे खांदे पाडल्याचे पाहायला मिळाले. त्याने अवघ्या २५ चेंडूत अर्धशतक पूर्ण केले.
सुनील नरेनसोबत शतकी भागीदारी
अजिंक्य रहाणेनं सलामीच्या लढतीत सलामीवीर सुनील नरेनच्या साथीनं दुसऱ्या विकेटसाठी १०३ धावांची भागीदारी केली. दोघांनी पॉवर प्लेनंतरही आक्रमक अंदाजात फटकेबाजी केली. सुनील नरेन २६ चेंडूत ५ चौकार आणि ३ षटकाराच्या मदतीने ४४ धावा करत बाद झाला. दोघांनी एका पाठोपाठ विकेट गमावल्यामुळे RCB चा संघ पुन्हा मॅचमध्ये आला. यंदाच्या आयपीएल मेगा लिलावात अजिंक्य रहाणे अनसोल्ड राहिला होता. त्यानंतर दुसऱ्या फेरीत कोलकाता नाईट रायडर्सच्या संघानं १.५ कोटी या मूळ किंमतीसह त्याला आपल्या ताफ्यात सामील करून घेतले. एवढेच नाही तर त्याच्यावर नेतृत्वाची जबाबदारी सोपवली. पहिल्याच सामन्यात त्याने आपली निवड एकदम योग्य असल्याचे दाखवून दिले आहे.