KL Rahul Delhi Capitals Captaincy : भारतीय संघाने नुकतीच चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धा जिंकली. या स्पर्धेच्या अंतिम सामन्यात विराट कोहली, रोहित शर्मा, हार्दिक पांड्यासारखे दिग्गज बाद झाल्यानंतर केएल राहुलने आपल्या अनुभवाच्या जोरावर भारताला सामना जिंकवून दिला. त्याने अप्रतिम खेळ करत ३४ धावांची नाबाद खेळी केली आणि संघाला ICC स्पर्धेचे विजेतेपद मिळवून दिले. आता IPL 2025 सुरु होणार आहे. यंदाच्या वर्षी राहुल दिल्ली कॅपिटल्स संघाकडून खेळणार आहे. चॅम्पियन्स ट्रॉफीमधून परतल्यानंतर केएल राहुलने कर्णधारपदाबाबत मोठा निर्णय घेतला आहे. मीडिया रिपोर्ट्स नुसार, राहुलने आगामी IPL मध्ये दिल्ली कॅपिटल्सचे कर्णधारपद स्वीकारण्याची ऑफर नाकारली आहे. रिपोर्टमध्ये म्हटले आहे की दिल्ली कॅपिटल्स फ्रँचायझीने राहुलला कर्णधारपदाची ऑफर दिली होती, जी त्याने स्वीकारण्यास नकार दिला.
केएल राहुलने नकार का दिला? आता पुढे काय?
मीडिया रिपोर्ट्सनुसार, केएल राहुलने कर्णधारपदाची ऑफर नाकारली याच्या मागे एक महत्त्वाचे कारण आहे. त्याला कर्णधारपदाची जबाबदारी घेऊन संघात वावरायचे नाही, त्यापेक्षा एक खेळाडू म्हणून त्याला संघात अधिक योगदान देण्याची इच्छा असल्याचे त्याने सांगितले आहे. केएल राहुलने संघाचे नेतृत्व करण्यास नकार दिल्यानंतर, आता पुढे काय असाही सवाल आहे. राहुलनंतर आता अक्षर पटेल दिल्ली फ्रँचायझीचा कर्णधार बनू शकतो असा अंदाज बांधला जात आहे. कारण सुरुवातीपासून कर्णधारपदासाठी या दोघांची नावे शर्यतीत होती. पण राहुलने नकार दिल्यानंतर अक्षरचा रस्ता मोकळा झाला आहे.
राहुल पहिल्यांदाच दिल्ली संघाकडून खेळणार
IPL Auction 2025 मध्ये दिल्ली कॅपिटल्सने केएल राहुलला १४ कोटी रुपयांची बोली लावून खरेदी केले. कारण राहुलला याआधी आयपीएलमध्ये कर्णधारपद भूषवण्याचा अनुभव आहे. २०२०-२१ मध्ये तो पंजाब किंग्जचा कर्णधार होता आणि २०२२ ते २०२४ पर्यंत तो लखनौ सुपर जायंट्सचा कर्णधार होता. अशा परिस्थितीत, जेव्हा दिल्ली कॅपिटल्सने त्याला संघात विकत घेतले, तेव्हा कर्णधारपदाच्या शर्यतीत त्याचे नाव आघाडीवर होते. कारण दिल्लीने रिषभ पंतला संघातून मुक्त केले होते. त्यामुळे त्याच्या तोडीचा कर्णधार मिळेल अशा अपेक्षेने राहुलचे नाव चर्चेत होते. पण, आता मीडिया रिपोर्ट्समध्ये असा दावा केला जात आहे की तो फक्त एक खेळाडू म्हणून खेळू इच्छितो, त्यामुळे राहुलचा हा निर्णय दिल्लीसाठीही कामी येऊ शकतो. राहुल हा आयपीएलमधील सर्वात सातत्यपूर्ण कामगिरी करणाऱ्या खेळाडूंपैकी एक आहे. जर राहुल कर्णधार नसेल, तर अक्षर कर्णधार होणार हे जवळपास निश्चित आहे.