KKR Appointed Dwayne Bravo As Their Mentor IPL 2025 : आयपीएल २०२५ च्या मेगा लिलावाआधी शाहरुख खानच्या मालकीच्या कोलकाता नाइट रायडर्स संघाने मोठा डाव खेळला आहे. गत चॅम्पियन आयपीएल फ्रँचायझी संघाने माजी कॅरेबियन खेळाडू ड्वेन ब्रावो याची संघाच्या मेंटॉरच्या रुपात नियुक्ती केली आहे. ड्वेन ब्रावोनं नुकतीच क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती घेतली आहे. आता आयपीएलमध्ये तो कोलकाता नाइट रायडर्सच्या ताफ्यात गौतम गंभीरच्या जागी काम करताना दिसेल.
ब्रावोकडे IPL शिवाय नाइट रायडर्सच्या या अन्य संघांचीही जबाबदारी
ड्वेन ब्रावो हा आयपीएलशिवाय अन्य संघांच्या माध्यमातूनही नाइट रायडर्सशी तो कनेक्ट राहिल. कॅरेबियन लीगमधील त्रिनिबागो नाइट रायडर्स (CPL), लॉस एंजेलिस नाइट रायडर्स (MLC) आणि अबु धाबी नाइट रायडर्स (IL टी20) या संघाची जबाबदारीही त्याच्याकडे सोपवण्यात आली आहे.
ब्रावोनं घेतली गंभीरची जागा
गत हंगामात गौतम गंभीर मेंटॉर असताना कोलकाता नाइट रायडर्स संघाने आयपीएलची फायनल जिंकली होती. गंभीरनं कॅप्टन्सीमध्येही या संघाला दोन वेळा चॅम्पियन केले आहे. गंभीर टीम इंडियाच्या प्रमुख प्रशिक्षकपदी नियुक्त झाल्यामुळे कोलकाता संघाच्या मेंटॉर पदाची जागा रिक्त झाली होती. ही जागा भरून काढण्यासाठी त्यांनी MS धोनीचा माजी सहकारी ब्रावोला पसंती दिल्याचटे दिसते.
दोन्ही लोकप्रिय संघाकडून IPL चॅम्पियनचा टॅग
ड्वेन ब्रावो हा आयपीएलमध्ये तीन फ्रँचायझी संघाकडून खेळताना दिसला आहे. यात त्याने गुजरात लायन्सशिवाय मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपर किंग्स संघाचे प्रतिनिधीत्व केले आहे. ब्रावो हा चार वेळचा आयपीएल चॅम्पियन खेळाडू आहे. मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपर किंग्स दोन्ही संघाकडून खेळताना तो चॅम्पियन ठरला होता. २०२४ च्या हंगामात तो धोनीच्या चेन्नई सुपर किंग्स संघाच्या बॉलिंग कोचच्या रुपात दिसला होता. टी-२० वर्ल्ड कप २०२४ मध्ये त्याने अफगाणिस्तानच्या संघाकडून गोलंदाजी सल्लागार भूमिका बजावली होती. अफगाणिस्तानच्या संघानेही या स्पर्धेत सेमीफायनलमध्ये धडक मारल्याचे पाहायला मिळाले होते.