IPL 2025 LSG vs CSK : पंत चुकला! धोनी-शिवम दुबे जोडी जमली; ५ पराभवानंतर CSK नं अखेर मॅच जिंकली!

या विजयासह चेन्नई सुपर किंग्जचं स्पर्धेतील आव्हान कायम

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 14, 2025 23:35 IST2025-04-14T23:33:14+5:302025-04-14T23:35:26+5:30

whatsapp join usJoin us
IPL 2025 LSG vs CSK MS Dhoni Lead Chennai Super Kings Beat Rishabh Pant Lucknow Super Giants And Register 2nd Win Shivam Dube Finish Match With Four | IPL 2025 LSG vs CSK : पंत चुकला! धोनी-शिवम दुबे जोडी जमली; ५ पराभवानंतर CSK नं अखेर मॅच जिंकली!

IPL 2025 LSG vs CSK : पंत चुकला! धोनी-शिवम दुबे जोडी जमली; ५ पराभवानंतर CSK नं अखेर मॅच जिंकली!

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

IPL 2025 LSG vs CSK 30th Match : लखनौच्या मैदानात रंगलेल्या सामन्यात सामन्यात महेंद्रसिंह धोनी आणि शिवम दुबे यांनी अर्धशतकी भागीदारी करत संघाला विजय मिळवून दिला. पहिल्या विजयानंतर पाच सामन्यात पराभवाचा सामना केल्यावर अखेर चेन्नई सुपर किंग्जला दुसरा विजय मिळाला.  संघ पुन्हा एकदा अडचणीत असताना धोनीच्या भात्यातून कडक फटकेबाजी पाहायला मिळाली. त्याने ११ चेंडूत ४ चौकार आणि एका षटकाराच्या मदतीने २०० पेक्षा अधिकच्या स्ट्राइक रेटनं नाबाद २६ धावांची खेळी केली. दुसऱ्या बाजूला शिवम दुबेनं ३७ चेंडूत ३ चौकार आणि २ षटकाराच्या मदतीने नाबाद ४३ धावा केल्या. या दोघांनी ३२ चेंडूत ५७ धावांची भागीदारी रचत पराभवाची मालिका खंडीत केली.

ती एक उणीव भरून निघाली अन् विजय निश्चित झाला

लखनौच्या संघानं दिलेल्या धावांचा पाठलाग करताना शेख राशिद आणि रचिन रविंद्र या जोडीनं चेन्नईला चांगली सुरुवात करून दिली. दोघांनी पहिल्या विकेटसाठी ५२ धावांची भागीदारी रचली. शेख राशिद पदार्पणाच्या सामन्यात १९ चेंडूत २७ धावा करून माघारी फिरला.  त्यानंतर रचिन रविंद्र याने २२ चेंडूत ३७ धावा काढत तंबूचा रस्ता धरला. राहुल त्रिपाठी पुन्हा अपयशी ठरला. त्याने १० चेंडूत ९ धावा करून बाद झाला. बढती मिळालेल्या जडेजालाही ७ धावांवरच तंबूत परतावे लागले. पण धोनी-दुबे जोडी जमली अन् एक मोठी उणीव भरून काढत चेन्नई सुपर किंग्जने सामना जिंकला. भागीदारी होत नसल्यामुळे चेन्नईला मागील काही सामन्यात पराभवाचा सामना करावा लागला. ही उणीव सलामी जोडीसह धोनी-दुबेनं या सामन्यात भरून काढल्याचे दिसून आले. 

पंत चुकला! जर हा डाव खेळला असता तर कदाचित रिझल्ट असता वेगळा

१५ षटकानंतर  चेन्नईच्या धावफलकावर ५ बाद १११ धावा असताना  महेंद्रसिंह धोनी मैदानात उतरला. ३० चेंडूत ५६ धावांची गरज असताना नवा चेंडू घेतल्यावर रवी बिश्नोईला गोलंदाजीसाठी आणून  चेन्नईवर दबाव टाकण्याचा एक पर्याय रिषभ पंतकडे होता., उत्तम गोलंदाजी करणाऱ्या बिश्नोईकरवी पंतनं फक्त ३ षटकेच टाकून घेतली. ही चूक LSG ला महागात पडली.    

पंतच्या अर्धशतकाच्या जोरावर लखनौनं सेट केलं होतं  १६७ धावांचे टार्गेट 

धोनीनं नाणेफेक जिंकून पहिल्यांदा गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. पहिल्यांदा फलंदाजी करताना लखनौ सुपर जाएंट्स संघाची सुरुवात खराब झाली. मार्करम ६ धावा करून पहिल्याच षटकात माघारी फिरला. खलील अहमदने चेन्नई सुपर किंग्जला जबरदस्त सुरुवात करून दिली. अंशुल कंबोज याने निकोलस पूरनच्या रुपात लखनौला दुसरा धक्का दिला. पॉवर प्लेमध्ये लखनौच्या संघाने २३ धावांवर मोठ्या विकेट्स गमावल्या. मिचेल मार्श २५ चेंडूत ३० धावा करून माघारी फिरला. त्याने पंतच्या साथीनं तिसऱ्या विकेटसाठी ३२ धावांची खेळी केली. आघाडीच्या फलंदाजांच्या विकेट्स गमावल्यावर रिषभ पंतने ४९ चेंडूत ६३ धावांची खेळी केली. अखेरच्या षटकात आयुष बडोनी २२ (१७) आणि अब्दुल समद २० (११)  यांनी केलेल्या उपयुक्त धावांच्या जोरावर लखनौच्या संघाने निर्धारित २० षटकात ७ बाद १६६ धावा केल्या होत्या. 

Web Title: IPL 2025 LSG vs CSK MS Dhoni Lead Chennai Super Kings Beat Rishabh Pant Lucknow Super Giants And Register 2nd Win Shivam Dube Finish Match With Four

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.