IPL 2025 LSG vs DC 40th Match Player to Watch Tristan Stubbs Delhi Capitals : यंदाच्या आयपीएल हंगामात दिल्लीचा संघ दमदार कामगिरी करतोय. संघाचा नवा कर्णधार अक्षर पटेल जुन्या अन् भरवाशाच्या गड्यांसह नव्या भिडूंच्या साथीनं कॅपिटल्सची गाडी मेट्रोच्या वेगाने सुसाट पुढे घेऊन चाललाय. दिल्ली कॅपिटल्सच्या संघाने ७ सामन्यात ५ विजय नोंदवत यंदाचा हंगाम गाजवण्यासाठी शड्डू ठोकला आहे. अक्षर पटेल, केएल राहुल या अनुभवी भारतीय खेळाडूंशिवाय दक्षिण आफ्रिकेचा स्टार ट्रिस्टन स्टब्स (Tristan Stubbs) हा देखील या संघातील प्रमुख खेळाडू आहे. एक नजर आयपीएलमधील त्याच्या आतापर्यंतच्या कामगिरीवर
अनसोल्ड राहिल्यावर MI नं दिली IPL पदार्पणाची संधी
दक्षिण आफ्रिकेच्या क्रिकेटरनं पाच वेळच्या चॅम्पियन मुंबई इंडियन्सच्या संघाकडून २०२२ च्या हंगामातून आयपीएलमध्ये पदार्पण केले. लिलावात अनसोल्ड राहिल्यावर मुंबई इंडियन्सच्या संघानं इंज्युरी रिप्लेसमेंटच्या रुपात २० लाख रुपये मोजत त्याला IPL मध्ये खेळण्याची संधी दिली. पदार्पणाच्या हंगामात दोन सामन्यात फक्त २ धावा केल्यावरही MI फ्रँचायझी संघानं त्याच्यावर भरवसा दाखवला अन् २०२३ च्या हंगामातही तो मुंबई इंडियन्सकडून खेळताना दिसला.
DC च्या ताप्यातून खेळताना धमक दाखवली, अन् भाव वाढला
मुंबई इंडियन्सकडून दोन हंगामात ४ सामने खेळल्यावर २०२४ च्या हंगामात तो ५० लाख प्राइज टॅगसह दिल्ली कॅपिटल्स संघाचा भाग झाला. गत हंगामात दिल्लीकडून त्याला १४ सामन्यात संधी मिळाली अन् त्यानेही हा हंगाम गाजवला. १४ सामन्यात ५४ च्या सरासरीसह १९०.९१ च्या स्ट्राइकरेटनं त्याने ३७८ धावा केल्या होत्या. त्याच्या भात्यातून ३ अर्धशतकं देखील आली. यात नाबाद ७१ ही त्याची सर्वोच्च धावसंख्या राहिली. या कामगिरीमुळे त्याचा भाव वाढला. दिल्ली कॅपिटल्सनं या खेळाडूला १० कोटी रुपयांसह कायम ठेवण्याचा निर्णय घेतला होता.
उपयुक्त खेळीसह महत्त्वपूर्ण भूमिका बजावतोय, पण...
यंदाच्या हंगामात ७ सामन्यातील एक सामना सोडला तर त्याने प्रत्येक सामन्यात दुहेरी आकडा गाठत उपयुक्त खेळी केल्याचे पाहायला मिळाले आहे. पाचव्या-सहाव्या क्रमांकावर छोट्यखानी खेळीसह तो संघासाठी महत्त्वपूर्ण भूमिका बजावताना दिसतोय. पण गत हंगामाच्या तुलनेत त्याच्या स्ट्राइक रेटमध्ये घसरण झाली आहे. उर्वरित सामन्यात तो यात सुधारणा करून संघासाठी कितपत फायदेशीर ठरणार ते पाहण्याजोगे असेल.