IPL 2025 LSG vs DC : आयपीएल २०२५ च्या हंगामातील ४० व्या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सच्या संघाने घरच्या मैदानात लखनौ सुपर जाएंट्सला धोबीपछाड दिली. लखनौच्या संघाने दिलेल्या १६० धावसंख्येचा पाठलाग करताना १८ व्या षटकातील पाचव्या चेंडूवर केएल राहुलनं षटकार मारत अगदी दिमाखात संघाला विजय मिळवून दिला. त्याने या सामन्यात नाबाद ५७ धावांची खेळी केली. या सामन्यात पहिल्यांदा फलंदाजी करताना लखनौच्या संघाने एडन मार्करमचे अर्धशतक आणि मिचेल मार्श आणि आयुष बडोनी यांनी केलेल्या उपयुक्त खेळीच्या जोरावर निर्धारित २० षटकात १५९ धावा केल्या होत्या. या धावसंख्येचा पाठलाग करताना दिल्लीच्या संघाकडून केएल राहुलसह अभिषेक पोरेलनंअर्धशतक झळकावल्याचे पाहायला मिळाले.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
लखनौला पराभूत करत पाचव्यांदा साधला हा डाव
दिल्ली कॅपिटल्स संघ यंदाच्या हंगामात कमालीची कामगिरी करताना दिसतोय. ८ सामन्यात ६ विजय मिळवत त्यांनी प्लेऑफ्सच्या शर्यतीत आपली दावेदारी आणखी भक्कम केली आहे. याआधी २००९, २०१२, २००१ आणि २०२१ च्या हंगामात दिल्ली कॅपिटल्सच्या संघाने पहिल्या ८ सामन्यापैंकी सहा सामने जिंकण्याचा पराक्रम केला होता. पण आतापर्यंत त्यांनी एकही ट्रॉफी जिंकलेली नाही. यंदाच्या हंगामात हा संघ नवा इतिहास रचण्याच्या इराद्याने मैदानात उतरल्याचे दिसून येत आहे.
LSG vs DC : KL राहुलची क्लास खेळी! Sanjiv Goenka यांची रिअॅक्शन व्हायरल
LSG च्या सलामी जोडीनं दमदार सुरुवात करुन दिली, पण...
पहिल्यांदा फलंदाजी करताना एडन मार्करम ५२ (३३) आणि मिचेल मार्श ४५ (३६) या जोडीनं धमाकेदार सुरुवात केली. दोघांनी पहिल्या विकेटसाठी ८७ धावांची भागीदारी रचली. पण स्टार फलंदाज पूरन ९ (५) स्वस्तात तंबूत परतल्यावर लखनौच्या संघ फसला. अखेरच्या षटकात इम्पॅक्ट प्लेयरच्या रुपात आलेल्या आयुष बडोनी याने २१ चेंडूत केलेल्या ३६ धावांच्या जोरावर लखनौच्या संघाने निर्धारित २० षटकात ६ बाद १५९ धावा केल्या होत्या. दिल्ली कॅपिटल्सकडून मुकेश कुमार याने सर्वाधिक ४ विकेट्स घेतल्या. त्याच्याशिवाय पूरनच्या रुपात मिचेल स्टार्कने एक तर चमीराने एक विकेट घेतल्याचे पाहायला मिळाले.
केएल राहुलसह अभिषेक पोरेलचे अर्धशतक, अक्षर पटेलचीही फटकेबाजी
या धावसंख्येचा पाठलाग करताना अभिषेक पोरेल आणि करुण नायर जोडीनं दिल्लीच्या डावाची सुरुवात केली. करुण नायर ९ चेंडूत १५ धावा करून माघारी फिरला. त्यानंतर अभिषेक पोरेल आणि केएल राहुल ही जोडी जमली. दोघांनी दुसऱ्या विकेटसाठी ७१ धावांची भागीदारी रचली. अभिषेक पोरेल याने ३६ चेंडूत ५ चौकार आणि एका षटकाराच्या मदतीने ५१ धावा करून मैदान सोडले. त्याची जागा घेण्यासाठी कॅप्टन अक्षर पटेल मैदानात उतरला. लोकेश राहुलनं कॅप्टनच्या साथीनं डाव पुढे नेत संघाला सहज विजय मिळवून दिला. षटकार मारत मॅच संपवणाऱ्या लोकेश राहुलनं ४२ चेंडूत ३ चौकार आणि ३ षटकाराच्या मदतीने नाबाद ५७ धावांची खेळी केली. दुसऱ्या बाजूला कर्णधार अक्षर पटेल याने २० चेंडूत १ चौकार आणि ४ षटकाराच्या मदतीने नाबाद ३४ धावांची खेळी केली.
Web Title: IPL 2025 LSG vs DC Delhi Capitals Beat Lucknow Super Giants Abishek Porel KL Rahul Mukesh Kumar Shines
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.