IPL 2025 LSG vs MI : रिषभ पंतच्या नेतृत्वाखालील लखनौच्या सुपर जाएंट्सच्या संघानं २०० पारच्या लढाईत मुंबई इंडियन्सच्या संघाला रोखून दाखवत घरच्या मैदानात विजय नोंदवला आहे. आवेश खान याने सूर्यकुमार यादवची विकेट घेत लखनौला आधी सामन्यात आणलं. त्यानंतर शार्दुल ठाकूरनं १९ व्या षटकात फक्त ७ धावा खर्च करत मुंबई संघावरील दबाव आणखी वाढवण्याचे काम केले. शेवटी आवेश खानने अखेरच्या षटकात हार्दिक पांड्याला मोठी फटकेबाजी करण्यापासून रोखण्यात यश मिळवत संघाच्या यशात मोलाचा वाटा उचलला.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
अखेरच्या षटकात हार्दिक पांड्या आणि तिलक वर्मा ही जोडी मैदानात होती. पण मोठी फटकेबाजी करण्याची क्षमता असणारा तिलक वर्मा बॅटला बॉल लागेना म्हणून तंबूत परतला. मुंबई इंडियन्सच्या ताफ्यातून घेण्यात आलेला हा निर्णय समजण्यापलिकडचा होता. दुसऱ्या बाजूला हार्दिक पांड्याने पुन्हा एकदा स्वत: मॅच संपवण्याचा आत्मविश्वास दाखवला. पण हा डाव उलटा फिरला. परिणामी मुंबई इंडियन्सला पराभवाचा सामना करावा लागला.
Hardik Pandya Record : पांड्यानं रचला इतिहास; IPL च्या इतिहासात अशी कामगिरी करणारा पहिला कर्णधार
तिलक वर्मा 'रिटायर्ड आउट'
७ चेंडूत २७ धावांची गरज असताना तिलक वर्मा 'रिटायर्ड आउट' होऊन तंबूत परतला. त्याच्या भात्यातून म्हणावी तशी फटकेबाजी होत नव्हती ही गोष्ट खरीये. पण त्याची जागा घेणारा फलंदाज काही आल्या आल्या षटकार मारणाऱ्या धाटणीतला नव्हता. मिचेल सँटनरनं मैदानात आल्यावर १९ व्या षटकातील चेंडूवर २ धावा घेतल्या. मग स्ट्राइक हार्दिक पांड्याकडे आले. अखेरच्या षटकात २२ धावांची गरज असताना हार्दिक पांड्याने आवेश खानला पहिल्याच चेंडूत षटकार मारला. पण त्यानंतर आवेश खानने कमबॅक करत हार्दिक पांड्याला मोठी फटकेबाजी करण्यापासून रोखले. पांड्याने अखेरच्या षटकात मिचेल सँटनरला स्ट्राइकला देणंही टाळलं. मग तिलक वर्माला बाहेर पाठवून त्याला बोलवून काय साध्य केले? असा एक प्रश्नही उपस्थितीत होतो.
शेवटच्या षटकात काय घडलं?
६ चेंडूत २२ धावांची आवश्यकता असताना आवेश खान घेऊन आलेल्या २० व्या षटकातील पहिल्याच चेंडूवर पांड्याने षटकार मारला. त्यानंतर दुसऱ्या चेंडूवर २ धावा आल्या. अखेरच्या ४ षटकात १४ धावांची गरज असताना पांड्यानं तिसरा चेंडू स्क्वेअर लेगच्या दिशेनं फटकावला. इथं दोन धावा होत नसल्यामुळे त्याने धावाच घेतली नाही. आवेश खाननं चौथा चेंडू निर्धाव टाकत पांड्याचे इरादे हाणून पाडले. २ चेंडूत १४ धावा हव्या असताना पाचव्या चेंडूवर पांड्याने एक धाव घेतली. सँटनरनला अखेरचा चेंडू निर्धाव टाकत लखनौच्या संघानं १३ धावांनी सामना जिंकला.
लखनौच्या संघानं पहिल्यांदा फलंदाजी करत सेट केलं होतं २०४ धावांचे टार्गेट
नाणेफेक गमावल्यावर लखनौच्या संघानं पहिल्यांदा फलंदाजी करताना मिचेल मार्श ६० (११) आणि मार्करम ५३ (५३) यांच्या अर्धशतकाशिवाय आयुष बडोनी ३० (१९) आणि डेविड मिलर २७ (१४) यांच्या उपयुक्त खेळीच्या जोरावर निर्धारित २० षटकात ८ गड्यांच्या मोबदल्यात २०३ धावा करत मुंबई इंडियन्ससमोर २०४ धावांचे टार्गेट सेट केले होते. या धावांचा पाठलाग करताना विल जॅक्स आणि रायन रिकल्टन या जोडीनं मुंबई इंडियन्सच्या डावाची सुरुवात केली. दोघेही सलामीवीर स्वस्तात माघारी फिरले. १७ धावांवर मुंबई इंडियन्सने दोन विकेट गमावल्या होत्या. त्यानंतर नमन धीर याने २४ चेंडूत ४६ धावा केल्या. तो तंबूत परतल्यावर सूर्यकुमार यादवनं आपल्या भात्यातील फटकेबाजी दाखवून दिली. त्याने ९ चौकार आणि एका षटकाराच्या मदतीने ६७ धावा करत मुंबई इंडियन्सच्या आशा पल्लवित केल्या. पण १७ व्या षटकातील पहिल्याच चेंडूवर आवेश खान याने त्याची विकेट घेतली अन् मॅच फिरली. हार्दिक पांड्यानं गोलंदाजीत जादू दाखवली. पण मोठी फटकेबाजी करण्यात तो कमी पडला. तिलक वर्मानं २३ चेंडूत २ चौकाराच्या मदतीने केलेल्या २५ धावांची खेळी मुंबई इंडियन्सच्या अडचणीत भर घालून गेली.