आयपीएलच्या यंदाच्या हंगामाला २२ मार्च पासून सुरुवात होतीये. भारतात आयपीएलची तुफान क्रेझ आहे. आपल्या आवडत्या क्रिकेट चाहत्यांची झलक पाहण्यासाठी काही चाहते स्टेडियमवर जाऊन मॅचचा आनंद घेण्याला पसंती देतात. IPL सामन्यावेळी स्टेडियममध्ये जी गर्दी दिसते त्यापेक्षाही अधिक गर्दी तिकीट मिळवण्यासाठी स्टेडियम बाहेर जमल्याचेही याआधी पाहायला मिळाले आहे. स्टेडियमशिवाय आयपीएल स्पर्धेतील सामन्यांचे तिकीट ऑनलाईनही उपलब्ध होत असते. जाणून घेऊयात आयपीएल मॅचसाठी तिकीट बूक करण्याची पद्धत आणि चेन्नई सुपर किंग्जच्या चाहत्यांसाठी असलेल्या चर्चेत ऑफरसंदर्भातील माहिती
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
ऑनलाइन तिकीट कुठं खरेदी करता येईल?
मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपर किंग्ज यांच्यातील लढतीसह कोणताही सामना तुम्हाला स्टेडियमवर जाऊन पाहायचा असेल तर आयपीएलच्या अधिकृत वेबसाइटला भेट देऊन तिकीट खरेदी करता येईल. याशिवाय फ्रँचायझी वेब साइटचा आणखी एक पर्याय निवडता येईल. या साइटवर भेट दिल्यावर तुम्हाला बुक माय शोच्या माध्यमातूनच फायनल तिकीट खरेदी करता येईल. थेट बुक माय शो वरुनही तिकीट खरेदी करण्याचा पर्याय निवडणे सर्वोत्तम ठरेल.
एका सामन्यासाठी किती पैसा मोजावा लागेल?
आयपीएल स्पर्धेतील सामन्यासाठीचा तिकीट दर हा स्टेडियम आणि संघ यानुसार बदलणारा असते. यंदाच्या हंगामात कोणत्या फ्रँचायझी संघाचे तिकीट किती? ही माहिती समोर आलेली नाही. पण गत हंगामातील दरानुसार, ७५० रुपयांपासून ते २८ हजार रुपयांपर्यंत तिकीट उपलब्ध असू शकते.
चेन्नई सुपर किंग्जच्या चाहत्यांसाठी खास ऑफर
चेन्नई सुपर किंग्जच्या चाहत्यांसाठी आयपीएलच्या सामन्याचा आनंद घेण्यासाठी स्टेडियमवर जाण्यासाठी अतिरिक्त पैसा खर्च करावा लागणार नाही. घरच्या मैदानात CSK ला सपोर्ट करण्यासाठी येणाऱ्या चाहत्यांसाठी चेन्नईमध्ये मेट्रो आणि सरकारी एसी बस सेवा सोडून इतर बसमधून मोफत स्टेडियमवर जाण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. चेन्नई सुपर किंग्जन चाहत्यांसाठी मेट्रो आणि परिवहन विभागासोबत तसा करार केला आहे. अन्य कोणत्याही फ्रँचायझी संघानं आपल्या चाहत्यांसाठी अशी सुविधा केलेली नाही.