Join us

IPL 2025: हाच खरा 'मॅचविनर'! अवघ्या १२ चेंडूत मिचेल स्टार्कने फिरवला सामना, संघ विजयी

Mitchell Starc match winner, IPL 2025 DC vs RR: ११.७५ कोटींच्या मिचेल स्टार्कने दिल्लीला मिळवून दिला धडाकेबाज विजय

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 17, 2025 10:51 IST

Open in App

Mitchell Starc match winner, IPL 2025 DC vs RR: यंदाच्या हंगामातील पहिली सुपर ओव्हर चाहत्यांना ३२व्या सामन्यात पाहायला मिळाली. दिल्ली कॅपिटल्स आणि राजस्थान रॉयल्स यांच्यात झालेला सामना टाय झाला. त्यानंतर सुपर ओव्हरमध्ये रोमहर्षक पद्धतीने दिल्लीने सामन्यात विजय मिळवला. प्रथम फलंदाजी करताना दिल्लीने १८८ धावा केल्या होत्या. या आव्हानाचा पाठलाग करताना राजस्थानेही १८८ धावाच केल्या. त्यानंतर झालेल्या सुपर ओव्हरमध्ये राजस्थानने प्रथम फलंदाजी करत ११ धावांवर २ गडी गमावले. प्रत्युत्तरात दिल्लीने बिनबाद १३ धावा करत सामना जिंकला. विजयाचा शिल्पकार ठरलेल्या मिचेल स्टार्कने अप्रतिम गोलंदाजी केली. ११.७५ कोटींची बोली लावून संघात घेतलेल्या मिचेल स्टार्कने अवघ्या १२ चेंडूत सामन्याचा निकाल पालटला.

१२ चेंडूत फिरला सामना

स्टार्कने पहिल्या षटकात फक्त २ धावा दिल्या होत्या, पण दुसऱ्या षटकात १९ धावा दिल्यानंतर त्याला गोलंदाजीपासून थांबवण्यात आले. यानंतर, स्टार्क १८ व्या षटकात परतला आणि त्याने सामना पालटून टाकला. राजस्थानला विजयासाठी ३ षटकांत ३१ धावांची आवश्यकता होती. स्टार्कने १८व्या षटकातील पहिल्या तीन चेंडूत तीन धावा दिल्या. चौथ्या चेंडूवर यॉर्कर टाकून ५१ धावांवर खेळणाऱ्या नितीश राणाला बाद केले. पुढल्या दोन चेंडूत केवळ ५ धावा आल्या. त्यामुळे १८व्या षटकात केवळ ८ धावा मिळाल्या.

यानंतर, स्टार्क २०व्या षटकात परतला. तेव्हा राजस्थानला केवळ ९ धावांची आवश्यकता होती आणि जुरेल-हेटमायर ही बिगहिटर जोडी मैदानात होती. स्टार्कने एकामागून एक यॉर्कर्सचा मारा केला. पहिल्या आणि दुसऱ्या चेंडूवर १-१ धाव मिळाली. तिसऱ्या आणि चौथ्या चेंडूवर २-२ धावा झाल्या. त्यानंतर पाचव्या आणि सहाव्या चेंडूवरही पुन्हा १-१ धाव मिळाली आणि स्टार्कने सामना बरोबरीत सोडवला.

सुपर ओव्हरमध्ये राजस्थानची हाराकिरी

सुपर ओव्हरमध्ये स्टार्कला पुन्हा गोलंदाजीची जबाबदारी मिळाली. पहिला चेंडू निर्धाव राहिला. पुढच्या चेंडूवर हेटमायरने चौकार मारला. तिसऱ्या चेंडूवर १ धाव घेतली. पुढच्या चेंडूवर रियान परागने चौकार मारला. त्यामुळे राजस्थानचा संघ चांगल्या लयीत होता. तो चेंडू नो बॉलदेखील झाला. त्यामुळे राजस्थानने ४ चेंडूत १० धावा केल्या होत्या. पण फ्री हिटवर रियान पराग धावबाद झाला तर पुढच्या चेंडूवर यशस्वी जैस्वाल २ धावा घेण्याच्या प्रयत्नात धावबाद झाला. अशाप्रकारे स्टार्कने फक्त ११ धावा दिल्या. त्यानंतर दिल्लीने १३ धावा करत सामना जिंकला.

टॅग्स :इंडियन प्रिमियर लीग २०२५दिल्ली कॅपिटल्सराजस्थान रॉयल्स