saurabh netravalkar ipl : मागील काही दिवसांपासून क्रिकेट विश्वाला IPL २०२५ च्या मेगा लिलावाच्या तारखेची प्रतीक्षा संपली होती ती आता संपली आहे. हा मेगा लिलाव २४ आणि २५ नोव्हेंबर रोजी सौदी अरेबियातील जेद्दाह येथे होणार आहे. बीसीसीआयने दिलेल्या माहितीनुसार, यंदाच्या मेगा लिलावासाठी एकूण १५७४ खेळाडूंनी नोंदणी केली असून त्यात इटलीच्या एका खेळाडूचा समावेश आहे. आयपीएलच्या इतिहासात इटालियन खेळाडूने मेगा लिलावासाठी नोंदणी करण्याची ही पहिलीच वेळ आहे. तसेच अमेरिकेच्या संघातील दहा खेळाडू लिलावात असतील.
अमेरिका आणि वेस्ट इंडिज येथे झालेल्या ट्वेंटी-२० विश्वचषकात सौरभ नेत्रावलकरने अप्रतिम कामगिरी केली होती. मूळचा भारतीय असलेल्या सौरभने अमेरिकेकडून खेळताना पाकिस्तानविरुद्ध कमाल केली होती आणि आपल्या संघाला विजय मिळवून दिला. अमेरिकेविरुद्धच्या पराभवामुळे शेजाऱ्यांना साखळी फेरीपर्यंतच समाधान मानावे लागले होते. याशिवाय सौरभ नेत्रावलकरने भारताविरुद्ध विराट कोहलीला बाद केले होते. यामुळेच सौरभचे नाव चर्चेत राहिले आणि काही आयपीएल फ्रँचायझी त्याला त्यांच्या संघात समाविष्ट करू इच्छितात. त्याची मूळ किंमत ३० लाख रुपये आहे. खरे तर सौरभशिवाय जुआनोय ड्रायस्डेल, अँड्रिस गॉस, आरोन जोन्स, नॉस्तुश केन्झिगे, अली खान, सुशांत मोदानी, सौरभ नेत्रावलकर, स्मित पटेल, हरमीत सिंग आणि उत्कर्ष श्रीवास्तव या अमेरिकन खेळाडूंनी आयपीएलच्या लिलावात भाग घेतला आहे.
यंदाचा इंडियन प्रीमिअर लीग २०२५ चा लिलाव २४ आणि २५ नोव्हेंबरला होणार आहे. हा लिलाव सौदी अरेबियाच्या जेद्दाह या शहरात होणार आहे. जेद्दाहच्या अबादी अल जोहर एरिनामध्ये हा लिलाव ठेवण्यात आला आहे. हॉटेल शांग्री-लामध्ये खेळाडू आणि इतर लोकांसाठी राहण्याची व्यवस्था केली जाणार असल्याचे आयपीएल प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे. दरम्यान, आयपीएल २०२५ साठी एकूण १५७४ खेळाडूंनी नोंदणी केली होती. यापैकी ११६५ खेळाडू भारतीय तर ४०९ खेळाडू हे परदेशी आहेत. एकूण खेळाडूंपैकी एकूण ३२० खेळाडू हे आंतरराष्ट्रीय स्तरावर खेळणारे आहेत. मेगा लिलावापूर्वी सर्व १० फ्रँचायझींनी मिळून एकूण ५५८.५० कोटी रुपये खर्च करून ४६ खेळाडूंना कायम ठेवले. यामध्ये ३६ खेळाडू भारतीय तर १० विदेशी खेळाडूंचा समावेश आहे. ३६ भारतीयांमध्ये १० अनकॅप्ड खेळाडू देखील आहेत. दहा फ्रँचायझींकडे २०४ खेळाडूंना खरेदी करण्यासाठी ६४१.५कोटी रुपये आहेत. या २०४ ठिकाणांपैकी ७० जागा परदेशी खेळाडूंसाठी आहेत.