IPL 2025 Mega Auction : इंडियन प्रीमिअर लीगच्या (Indian Premier League) आगामी हंगामासाठी होणाऱ्या मेगा लिलावात १५७४ खेळाडूंनी नाव नोंदणी केली आहे. २०४ स्लॉटसाठी ३०४ कॅप्ड खेळाडूंसह १२२४ अनकॅप्ड खेळाडूंचा यात समावेश आहे. सौदी अरेबियातील जेद्दाह शहरात मेगा लिलाव प्रक्रिया पार पडणार आहे. या लिलावात सहभागी खेळाडूंनी नियमानुसार, किमान २० लाख ते कमाल २ कोटी रुपये मूळ किंमतीसह नाव नोंदणी केली आहे. इथं एक नजर टाकुयात सर्वाधिक २ कोटी या मूळ किंमतीसह नाव नोंदणी करणाऱ्या खेळाडूंची यादी
कुणाचा भाव गगनाला भिडणार कोण अनसोल्ड राहणार?
इएसपीएनक्रिकइन्फोच्या वृत्तानुसार, आगामी IPL २०२५ च्या मेगा लिलावासाठी अनेक भारतीय आणि परदेशी खेळाडूंनी त्यांची मूळ किंमत २ कोटी रुपये ठेवली आहे. यातील कुणाचा भाव गगनाला भिडणार अन् कुणावर अनसोल्ड राहण्याची वेळ येणार ते लिलावातच स्पष्ट होईल.
२ कोटींच्या गटातील या भारतीयांना मिळू शकते खूप मोठी रक्कम
भारतीय खेळाडूंमध्ये श्रेयस अय्यर, रिषभ पंत आणि लोकेश राहुल ही मंडळी २ कोटी मूळ किंमत असलेल्या खेळाडूंच्या गटात आहे. या भारतीय खेळाडूंवर अनेक फ्रँचायझी संघाच्या नजरा असतील. पंजाब किंग्स, दिल्ली कॅपिटल्स, लखनऊ सुपर जाएंट्स, कोलकाता नाईट रायडर्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु हे संघ या खेळाडूंवर बोली लावण्यासाठी आघाडीवर असतील, अशी अपेक्षा आहे.
या परदेशी खेळाडूला २ कोटी किंवा त्यापेक्षा मोठी रक्कम देण्याचं धाडस कोण करणार?
आयपीएलच्या आतापर्यंतच्या इतिहासातील सर्वात महागडा ठरलेला मिचेल स्टार्कसह इंग्लंडचा स्टार गोलंदाज जोफ्रा आर्चर हा देखील २ कोटी मूळ किंमत असलेल्या खेळाडूंच्या यादीत आहे. गत आयपीएल हंगामासाठी झालेल्या मिनी लिलावात कोलकातान नाईट रायडर्सच्या संघाने मिचेल स्टार्कवर विक्रमी २४.७५ कोटी इतकी मोठी बोली लावली होती. पण आगामी हंगामाआधी या संघाने त्याला रिलीज केले आहे. जोफ्रा आर्चर हा दुखापतीमुळे बऱ्याच दिवसांपासून क्रिकेटपासून दूर आहे. या परिस्थितीत त्याच्यासाठी २ कोटी खर्च करण्याचे धाडस कोण करणार ते बघण्याजोगे असेल.
मेगा लिलावासाठी २ कोटी मूळ किंमतीसह नाव नोंदणी करणाऱ्या खेळाडूंची यादी
रिषभ पंत, लोकेश राहुल, श्रेयस अय्यर, रविचंद्रन अश्विन, युझवेंद्र चहल, मोहम्मद शमी, खलील अहमद, दीपक चाहर, व्यंकटेश अय्यर, आवेश खान, इशान किशन, मुकेश कुमार, भुनवेश्वर कुमार, प्रसिद्ध कृष्णा, टी नजराजन,, देवदत्त पड्डीकल, क्रुणाल पांड्या, हर्षल पटेल, अर्शदीप सिंग, वॉशिंग्टन सुंदर, शार्दुल ठाकूर, मोहम्मद सिराज, उमेश यादव, मिचेल स्टार्क, जोफ्रा आर्चर.