आयपीएलच २०२५ साठी होणाऱ्या मेगा लिलावाची सध्या जोरदार चर्चा रंगताना दिसत आहे. २५ आणि २६ नोव्हेंबरला रियाध येथे मेगा लिलाव प्रक्रिया पार पडणार असल्याचे वृत्त समोर आले आहे. या लिलावात अनेक स्टार खेळाडूंवर मोठी बोली लागल्याचे पाहायला मिळेल.
महागड्या रिटेन प्लेयरसह मिळाले IPL इतिहासातील सर्वात महागडी बोली लागण्याचे संकेत
मेगा लिलावाआधी काही खेळाडूंना फ्रँचायझी संघाने मोठ्या रक्कमेसह आपल्या ताफ्यात कायम ठेवल्याचे पाहायला मिळाले. सनरायझर्स हैदराबादच्या संघाने २३ कोटी मोजून क्लासेनला रिटेन केले. आयपीएलच्या इतिहासातील तो सर्वात महागडा रिटेन प्लेयर ठरला आहे. त्यामुळे मेगा लिलावात आयपीएल इतिहासातील सर्वात मोठी बोली लागल्याचे पाहायला मिळेल, असे संकेत मिळतात.
अर्जुन तेंडुलकरसाठीही पाहायला मिळणार मोठी चढाओढ?
कोणत्या खेळाडूवर सर्वाधिक बोली लागणार या मुद्यासह अर्जुन तेंडुलकरला कोणता संघ आपल्या ताफ्यात सामील करून घेईल, हा मुद्दाही चर्चेचा ठरत आहे. अर्जुन तेंडुलकर हा लेफ्ट आर्म पेसर आहे. बॅटिंग करण्याची क्षमताही त्याच्यात आहे. मुंबई इंडियन्सकडून त्याला फारशी संधी मिळालेली नाही. मुंबई इंडियन्स त्याच्यावर पुन्हा डाव खेळल्याचेही पाहायला मिळू शकते. याशिवाय काही अन्य संघही या अनकॅप्ड खेळाडूला आपल्या ताफ्यात घेऊ शकतात. जाणून घेऊयात त्यामागचं कनेक्शन
प्रीतीचा पंजाबचा संघही दाखवू शकतो उत्सुकता
प्रीती झिंटाच्या मालकीच्या पंजाब किंग्स संघाच्या पर्समध्ये मोठी रक्कम शिल्लक आहे. हा संघ मेगा लिलावात मोठा डाव खेळण्यासोबत अर्जुन तेंडुलकरला आपल्या ताफ्यात घेण्याची उत्सुकताही दाखवू शकतो. संघ बांधणी करताना पंजाबचा संघ नेहमी प्रतिष्ठित खेळाडूंवर डाव खेळण्याला पसंती देताना दिसले आहे. अर्जुन तेंडुलकरनं मुंबई इंडियन्सकडून खेळताना पंजाबविरुद्ध एका ओव्हरमध्ये ३१ धावा खर्च केल्या होत्या. या महागड्या षटकानंतर प्रीती झिंटानं त्याची पाठराखण केली होती.
गुजरात टायटन्सनं याआधी लावली होती बोली, नेहरामुळे इथंही होऊ शकते अर्जुनची एन्ट्री
गुजरात टायटन्सच्या ताफ्यातील आशीष नेहरा नव्या चेहऱ्यांची पारख करण्यात माहिर आहे. नेहरानं एकदा अर्जुन तेंडुलकर बोली लावल्याचे पाहायला मिळाले होते. यावेळीही पुन्हा गुजरातकडून अर्जुन तेंडुलकरला आपल्या ताफ्यात घेण्याचा डाव खेळला जाऊ शकतो. मुंबई इंडियन्सच्या तुलनेत तो इथं फिट बसू शकतो. एवढेच नाही तर त्याला हिट होण्याची एक संधीही मिळू शकते.
चेन्नई सुपर किंग्समध्ये गेला तर पाहायला मिळेल खास ट्विस्ट
जो महेंद्रसिंह धोनीच्या चेन्नई संघात येतो तो हिरो ठरतो. अजिंक्य रहाणेनं या संघात येऊन आपल्यातील टी-२० तोरा दाखवून सर्वांनाच आश्चर्यचकित केले होते. ज्या खेळाडूचं काहीच होणार नाही असं वाटतं असते त्या खेळाडूवर डाव खेळत चेन्नईनं त्याला यशाच्या शिखरावर नेलं आहे. याच विचारानं त्यांनी अर्जुनवर डाव खेळला तर युवा खेळाडूसाठी ती एक मोठी संधीच असेल. मुंबईकर सचिनचा मुलगा येलो जर्सीत दिसला तर तो एक रंजक सीनच ठरेल.
कोलकाता नाईट रायडर्समध्येही मिळू शकते जागा
गौतम गंभीरनंतर कोलकाता नाईट रायडर्सच्या संघ बांधणीची सूत्रे ही चंद्रकांत पंडित यांच्याकडे आहेत. चंद्रकांत पंडित आणि सचिन यांच्यात चांगली मैत्री आहे. ते दोघेही रमाकांत आचरेकर यांचे शिष्य आहेत. त्यामुळे अर्जुनचं या संघातही सेटिंग लागू शकते. अर्जुनला आपल्या ताफ्यात घेऊन त्याची कारकिर्द वाढवण्यासाठी मदत करणार का? ते पाहण्याजोगे असेल.