IPL 2025 MI vs RCB 20th Match : वानखेडेच्या मैदानात रंगलेल्या आयपीएलच्या यंदाच्या हंगामातील २० व्या लढतीत रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुच्या संघानं २०० पारची लढाई जिंकली आहे. दहा वर्षांच्या प्रतिक्षेनंतर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुच्या संघाने वानखेडेच्या मैदानात मुंबई इंडियन्सला पराभूत केले आहे. २२१ या मोठ्या धावसंख्येचा पाठलाग करताना तिलक वर्मा आणि हार्दिक पांड्या यांनी धमाकेदार खेळी करत मुंबई इंडियन्सच्या संघाला सामन्यात आणले होते. पण भुनवेश्वर कुमारनं ही जोडी फोडली. १७ व्या षटकात त्याने तिलक वर्माची विकेट घेत सामन्यात पहिले ट्विस्ट आणले. पुढच्याच षटकात हेजलवूडनं आक्रमक फलंदाजी करणाऱ्या हार्दिक पांड्याची विकेट घेतली अन् रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुला मोठा दिलासा मिळाला.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
अखेरच्या निर्णायक षटकात क्रुणाल पांड्याची विक्रमी कामगिरी
तिलक वर्मा आणि हार्दिक पांड्याची विकेट गमावल्यावर अखेरच्या षटकात मुंबई इंडियन्सच्या संघाला १९ धावांची गरज होती. बंगळुरुच्या संघाचा कर्णधार रजत पाटीदार याने हार्दिक पांड्याच्या संघाला रोखण्यासाठी त्याचा भाऊ क्रुणाल पांड्याच्या हाती चेंडू सोपवला. क्रुणाल पांड्यानं आपल्यावरील विश्वास सार्थ ठरवला. त्याने अखेरच्या षटकात ४ विकेट्स घेत आयपीएलच्या इतिहासात पहिल्यांदा ४ विकेट्स घेण्याचा पराक्रम नोंदवत RCB चा विजय निश्चित केला.
IPL 2025 MI vs RCB : हिटमॅनचा फ्लॉप शो कायम! रितिकाचा चेहरा पडला; 'विराट' सेलिब्रेशनही चर्चेत
तिलक वर्मा-हार्दिक पांड्याची फटकेबाजी
आरसीबीने दिलेल्या धावांचा पाठलाग करताना मुंबई इंडियन्सच्या संघानं दहाव्या षटकात सूर्यकुमार यादवच्या रुपात ९९ धावांवर चौथी विकेट गमावली होती. संघ अडचणीत असताना तिलक वर्मा आणि हार्दिक पांड्याने तुफान फटकेबाजी करत सामन्यात रंग भरला. १३ व्या षटकात या जोडीनं सुयशच्या षटकात १७ धावा चोपल्या. १४ वे षटक घेऊन आलेल्या हेजलवूडच्या षटकात या जोडीनं २२ धावा कुटल्या. त्यानंतर १५ व्या षटकात क्रुणालचीही त्यांनी धुलाई केल्याचे पाहायला मिळाले. या षटकात तिलक आणि हार्दिकनं १९ धावा केल्या. भुवनेश्वरच्या १६ व्या षटकात १३ धावा करत या जोडीनं सामना मुंबई इंडियन्सच्या बाजूनं वळवला होता. पण १७ व्या आणि १८ व्या षटकात दोघांची पाठोपाठ विकेट पडली आणि मुंबई इंडियन्सच्या संघाचे टेन्शन वाढले. शेवटी हा सामनाही हातून निसटला. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुच्या संघाने १२ धावांनी विजय मिळवत यंदाच्या हंगामातील तिसऱ्या विजयाची नोंद केली.