IPL 2025 MI vs RCB : मुंबईच्या वानखेडेच्या मैदानात पहिल्यांदा फलंदाजी करताना रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुच्या संघाने पहिल्या षटकात पहिली विकेट गमावल्यावर मुंबई इंडियन्स विरुद्धची लढाई २०० पारची केली. सलामीवीर फिल सॉल्ट सोडला तर आरसीबीच्या ताफ्यातील प्रत्येक बॅटर मुंबई इंडियन्सच्या गोलंदाजांवर तुटून पडल्याचे पाहायला मिळाले. विराट कोहलीसह कॅप्टन रजत पाटीदारनं संघाकडून अर्धशतकी खेळी केली. या दोघांशिवाय देवदत्त पडिक्कल आणि जितेश शर्मा यांनी स्फोटक फटकेबाजीसह आरसीबीच्या धावफलकावर २२१ धावा लावण्यासाठी बहुमूल्य योगदान दिले.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
किंग कोहलीचं दमदार अर्धशतक, देवदत्त पडिक्कलनंही दिली उत्तम साथ
ट्रेंट बोल्टनं पहिल्याच षटकातील दुसऱ्या चेंडूवर फिल सॉल्टला बोल्ड केले. त्यानंतर किंग कोहली आणि देवदत्त पडिक्कल यांनी दुसऱ्या विकेटसाठी ९१ धावांची भागीदारी करत मुंबई इंडियन्सच्या गोलंदाजांचे खांदे पाडले. देवदत्त पडिक्कल २२ चेंडूत २ चौकार आणि ३ षटकाराच्या मदतीने ३७ धावा करून तंबूत परतला. त्यानंतर रजत पाटीदार आणि कोहली जोडी जमली. या दोघांनी तिसऱ्या विकेटसाठी ४८ धावांची भागीदारी रचली. किंग कोहलीनं अर्धशतकी खेळी करताना ४२ चेंडूत ८ चौकार आणि २ षटकाराच्या मदतीने ६७ धावा केल्या. आरसीबीकडून ही सर्वोच्च धावसंख्या ठरली.
Kohli vs Bumrah : सवंगड्याची इच्छापूर्ती! खरंच किंग कोहलीनं सिक्सर मारत केलं बुमराहचं स्वागत
रजत पाटीदारसह जितेश शर्माने केली किंग कोहलीपेक्षा कडक बॅटिंग
किंग कोहली माघारी फिरल्यावर त्याची जागा घेण्यासाठी आलेला लिविंगस्टोन खातेही न उघडता माघारी फिरला. त्याची जागा घेण्यासाठी आलेल्या जितेश शर्मानंही आपल्या भात्यातील कडक फलंदाजीचा नजराणा पेश केला. जितेशनं कर्णधाराच्या साथीनं पाचव्या विकेटसाठी ६९ धावांची भागीदारी रचली. रजत पाटीदार ३२ चेंडूत ५ चौकार आणि ४ षटकाराच्या मदतीने २०० च्या स्ट्राइक रेटनं ६४ धावा करून माघारी फिरला. त्यानंतर जितेश शर्माने १९ चेंडूत नाबाद ४० धावांची खेळी केली. त्याने २१० च्या स्ट्राइक रेटन धावा कुटताना २ चौकारासह ४ षटकार मारल्याचे पाहायला मिळाले. कॅप्टन रजत पाटीदारसह जितेशची खेळी कोहलीपेक्षा कडक होती.
Web Title: IPL 2025 MI vs RCB Rajat Patidar And Jitesh Sharma Better Strike Rate Than Virat Kohli Royal Challengers Bengaluru Set 222 Target For Mumbai Indians
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.