मुंबई इंडियन्सच्या संघाची यंदाच्या हंगामाची सुरुवात खराब झाली. चेन्नई सुपर किंग्ज आणि गुजरात टायटन्स यांच्याविरुद्धच्या दोन पराभवानंतर कोलकाता नाईट रायडर्स विरुद्धच्या विजयासह मुंबई इंडियन्सने यंदाच्या हंगामातील पहिला विजय नोंदवला. पण त्यानंतर मुंबई इंडियन्सला लखनौ सुपर जाएंट्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुच्या संघाकडून पराभवाचा सामना करावा लागला. दिल्ली कॅपिटल्सला पराभूत करत मुंबई इंडियन्सच्या संघाने पुन्हा कमबॅक केले. पटरीवरून घसरलेल्या MI पलटनला रुळावर आणण्यासाठी कर्ण शर्मानं मोठी भूमिका बजावल्याचे पाहायला मिळाले. कधी काळी रेल्वे ट्रॅकची देखभालीच काम करणाऱ्या या लेग स्पिनरवर उर्वरित सामन्यातही MI पटनच्या मार्गातील अडथळे दूर करून संघाला ट्रॅकवर कायम ठेवण्याची एक मोठी जबाबदारी असेल. जाणून घेऊयात या फिरकीपटूसंदर्भातील काही खास गोष्टी
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
IPL मध्ये दुसऱ्यांदा सामनावीर पुरस्कार कर्ण शर्मा हा २००९ च्या हंगामापासून वेगवेगळ्या फ्रँचायझीकडून आतापर्यंत आयपीएलमध्ये ८५ सामने खेळला आहे. यात त्याने ७९ विकेट्स आपल्या खात्यात जमा केल्या आहेत. दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध मॅच फिरवून त्याने सामनावीरचा पुरस्कार पटकवला. त्याच्या आयपीएल कारकिर्दीत दुसऱ्यांदा त्याला हा पुरस्कार मिळाल्याचे पाहायला मिळाले. याआधी २०१७ च्या हंगामात मुंबई इंडियन्सकडून खेळतानाच त्याने सामनावीर पुरस्कार पटकवला होता.
IPL 2025: हाच खरा 'मॅचविनर'! अवघ्या १२ चेंडूत मिचेल स्टार्कने फिरवला सामना, संघ विजयी
तीन संघांकडून IPL चॅम्पियनचा टॅग
२००९ मध्ये आरसीबीकडून पदार्पण करणाऱ्या कर्ण शर्माच्या नावे सलग तीन हंगामात वेगवेगळ्या संघाकडून ट्रॉफी जिंकण्याचा खास रेकॉर्ड आहे. सनरायझर्स हैदराबाद (२०१६), मुंबई इंडियन्स (२०१७) आणि चेन्नई सुपर किंग्ज (२०१८) या तीन वेगवेगळ्या फ्रँचायझीकडून खेळताना त्याने IPL ट्रॉफी जिंकली आहे.
रेल्वे ट्रॅक दुरुस्ती अन् देखभालीचं काम; १७ हजार पगार IPL मुळे झाला 'करोडपती'
उत्तर प्रदेशचा हा क्रिकेटर उजव्या हाताने लेग स्पिन गोलंदाजीसह डावखुऱ्या हाताने फटकेबाजी करतो. २००५ मध्ये या क्रिकेटरनं रेल्वेत चतुर्थ श्रेणी कामगार म्हणून नोकरीची सुरुवात केली. तो रेल्वे पटरी दुरुस्ती आणि देखभालीचे काम करायचा. क्रिकेट खेळत असल्यामुळे त्याला मेहनतीच्या कामातून सूटही मिळायची. २०१४ च्या हंगामात सनरायझर्स हैदराबादच्या संघाने त्याच्यावर कोट्यवधीची बोली लावली होती. १७ हजार पगार असताना काव्या मारनच्या संघाने या फिरकीपटूसाठी ३ कोटी ७५ लाख रुपये मोजले होते. यंदाच्या हंगामात ५० लाख रुपयांसह पुन्हा तो मुंबई इंडियन्सच्या ताफ्यातून खेळताना दिसतोय. इम्पॅक्ट प्लेयरच्या रुपात संधी मिळताच त्याने संधीचं सोनंही करून दाखवलं आहे. उर्वरित सामन्यात त्याला किती संधी मिळणार अन् तो कसा आपला इम्पॅक्ट टाकणार ते पाहण्याजोगे असेल.