IPL 2025 MI vs SRH 33rd Match Player to Watch Pat Cummins Sunrisers Hyderabad : आयपीएलच्या यंदाच्या हंगामात पॅट कमिन्सच्या नेतृत्वाखालील गत उपविजेत्या सनरायझर्स हैदराबादच्या संघाने धमाक्यात सुरुवात केली. पण तो तोरा त्यांना कायम राखता आला नाही. प्रतिस्पर्धी गोलंदाजांवर तुटून पडण्याचा हैदराबादी फलंदाजांचा डाव संघाच्या अंगलट आला. फलंदाजीशिवाय गोलंदाजीत पॅट कमिन्सला त्याचा क्लास दाखवता आलेला नाही. फलंदाजांसाठी अनुकूल असलेल्या खेळपट्टीवरही खास छाप सोडण्याची क्षमता पॅट कमिन्समध्ये आहे. पण यंदाच्या हंगामात त्याच्या गोलंदाजीतील धमक काही दिसलेली नाही. वानखेडेच्या मैदानात रंगणाऱ्या मुंबई इंडियन्सविरुद्धच्या सामन्यात संघाच्या कामगिरीसह स्वत:च्या गोलंदाजीतील धार दाखवून देण्याचे दुहेरी चॅलेंज ऑरेंज आर्मीच्या कॅप्टनसमोर असेल.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
आव्हानात्मक खेळपट्टीवर पॅट कमिन्स छाप सोडणार?
वानखेडेच्या मैदानातील खेळपट्टी ही फलंदाजासाठी अनुकूल राहिली आहे. इथं गोलंदाजांना खूप मेहनत घ्यावी लागते. पण सुरुवातीला अचूक टप्प्यावर गोलंदाजी केली तर गोलंदाजही या मैदानात छाप सोडू शकतात. मुंबई इंडियन्सकडून डावाची सुरुवात करताना रोहित शर्मा पॉवर प्लेमध्ये अडखळत खेळताना पाहायला मिळाले आहे. पॅट कमिन्स या गोष्टीचा फायदा घेत संघाला चांगली सुरुवात करून देण्याचा डाव साधणार का? ते पाहण्याजोगे असेल.
VIDEO: 'सुपर ओव्हर'मध्ये राजस्थानला होती जिंकायची संधी, पण 'फ्री हिट' मिस झाली अन् मॅच गमावली
६ सामन्यात फक्त ४ विकेट्स
राजस्थान रॉयल्स विरुद्धच्या पहिल्या सामन्यात पॅट कमिन्स याने ४ षटकात ६० धावा खर्च केल्या. यात त्याला एकही विकेट मिळवता आली नव्हती. लखनौ विरुद्ध ३ षटकात २९ धावा खर्च करत त्याने २ विकेट्स घेतल्या. पण त्यानंतर दिल्ली कॅपिटल्स विरुद्धच्या सामन्यात तो विकेट लेस राहिला. कोलकाता आणि गुजरात विरुद्धच्या सामन्यात प्रत्येकी १-१ विकेट घेतल्यावर पंजाब किंग्ज विरुद्धच्या सामन्यातही त्याला विकेट मिळाली नव्हती. ६ सामन्यात त्याने फक्त ४ विकेट्स घेतल्या आहेत.
पॅट कमिन्सची IPL मधील कामगिरी
ऑस्ट्रेलियन स्टार क्रिकेटर आणि वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टनच्या नेतृत्वाखालीच सनरायझर्स हैदराबादच्या संघाने गत हंगामात फायनलपर्यंत मजल मारली होती. या हंगामात पॅट कमिन्सनं सर्वोत्तम कामगिरी करताना १८ विकेट घेतल्याचे पाहायला मिळाले होते. आतापर्यंत ६४ आयपीएल सामन्यात त्याच्या खात्यात ६७ विकेट्स जमा आहे. २०२० च्या हंगामात ३४ धावा खर्च करून ४ विकेट्स ही त्याची सर्वोच्च कामगिरी आहे.
Web Title: IPL 2025 MI vs SRH 33rd Match Lokmat Player to Watch Pat Cummins Sunrisers Hyderabad
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.