लवकरच आयपीएल २०२५ साठी मेगा लिलाव पार पडेल. आगामी आयपीएल हंगामासाठी कोलकाता नाईट रायडर्सच्या संघाने खेळाडूंना रिटेन केलेली यादी खूपच मनोरंजक आहे. राजस्थान रॉयल्स व्यतिरिक्त केकेआर हा एकमेव संघ आहे ज्यांनी, सहा खेळाडूंना कायम ठेवले आहे. KKR ने आयपीएल २०२४ च्या लिलावात मिचेल स्टार्कला २४.७५ कोटी रुपयांना खरेदी करुन इंडियन प्रीमिअर लीगच्या इतिहासातील सर्वात महागडा खेळाडू बनवला. मात्र, आयपीएल २०२५ साठी रिटेन न केल्याने मिचेल स्टार्कने एक मोठे विधान करून खळबळ उडवून दिली आहे.
स्टार्क म्हणाला की, मला अद्याप केकेआरच्या फ्रँचायझीकडून कोणताही फोन किंवा संदेश आलेला नाही. खरे तर हे फ्रँचायझी क्रिकेट आहे. सनरायझर्स हैदराबादचे खेळाडू ट्रॅव्हिस हेड आणि पॅट कमिन्स वगळता सर्व ऑस्ट्रेलियन खेळाडू IPL 2025 साठी मेगा लिलावात असतील. स्टार्कने एका मुलाखतीत हे विधान केल्याने याची चर्चा रंगली आहे. आयपीएलच्या इतिहासात सर्वात महागडा खेळाडू ठरल्याने स्टार्कवर मोठी जबाबदारी होती. मात्र, आयपीएल २०२४ च्या सुरुवातीला त्याला खास काही करता आले नाही. पण केकेआरने प्लेऑफमध्ये प्रवेश करताच स्टार्कने आपली चमक दाखवून दिली.
दरम्यान, आयपीएल २०२५ साठी १० संघांनी एकूण ४६ खेळाडूंना रिटेन केले आहे, त्यापैकी फक्त दोन खेळाडू ऑस्ट्रेलियाचे आहेत. या दोन खेळाडूंना सनरायझर्स हैदराबादने कायम ठेवले. तर, डेव्हिड वॉर्नर, मिचेल स्टार्क, ग्लेन मॅक्सवेल, मिचेल मार्श आणि टिम डेव्हिडसारखे प्रसिद्ध खेळाडू आयपीएलच्या लिलावात उतरणार आहेत. त्यांच्यासह भारतीय संघातील स्टार खेळाडूदेखील आयपीएलच्या लिलावात असतील. यामध्ये रिषभ पंत, श्रेयस अय्यर, लोकेश राहुल आणि मोहम्मद सिराज यांसारख्या शिलेदारांचा समावेश आहे.