आयपीएल २०२५ स्पर्धेसाठी राजस्थान रॉयल्स संघाचा कर्णधार आणि विकेट किपर बॅटर संजू सॅमसन संघाच्या ताफ्यात सामील झाला आहे. टीम इंडियाकडून टी-२० मालिकेत खेळताना संजू सॅमसन दुखापतग्रस्त झाला होता. त्याच्या बोटाला झालेली इजा ही राजस्थान संघाचे टेन्शन वाढवणारी होती. पण आता तो तंदुरुस्त होऊन परतल्यामुळे या फ्रँचायझी संघाला मोठा दिलासा मिळाला आहे.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
तंदुरुस्त होऊन आला अन् दुखापतीतून सावरणाऱ्या द्रविडकडे पाहून थक्क झाला
बंगळुरुस्थित राष्ट्रीय क्रिकेट अकादमीत पुनर्वसन प्रक्रिया पार करून तंदुरुस्ती चाचणी देऊन संजू सॅमसन आयपीएलचं मैदान गाजवण्यासाठी सज्ज झालाय. संघाच्या ताफ्यात आल्यावर कॅप्टन संजू सॅमसन याने संघाचे संघाचे प्रशिक्षक राहुल द्रविड यांची गळाभेट घेतली. दुखापतीतून सावरणाऱ्या द्रविडला व्हीलचेअरवर बघून संजूनं दिलेली रिअॅक्शन सध्या चर्चेचा विषय ठरत आहे. दुखापत होऊनही मैदानात खेळाडूंसोबत थांबण्याची कोचची भूमिका पाहून तो थक्क झाल्याचे पाहायला मिळाले.
द्रविडची गळाभेट; संजूची बोलकी हावभाव चर्चेत
राजस्थान रॉयल्सच्या प्रशिक्षण शिबिरात पोहचल्यावर सजू सॅमसन याने राहुल द्रविडची गळाभेट घेतली. द्रविड दुखापतीतून सावरत असल्यामुळे तो व्हीलचेअरवरच बसून होता. गुरुबद्दल आदर व्यक्त करताना संजूच्या चेहऱ्यावरील हावभाव खूप काही बोलून जाणारी होती. राजस्थान रॉयल्सच्या संघानं आपल्या अधिकृत सोशल मीडिया अकाउंटवरून कॅप्टन-कोच जोडीचा खास व्हिडिओ शेअर केला आहे. यात द्रविडच्या दिशेनं जात असताना संजूच्या चेहऱ्यावरील हावभाव आणि भेटीनंतर कंबरेवर हात ठेवून त्याच्या द्रविडवर खिळलेल्या नजरा हे दृश्य "तुसी ग्रेट हो कोच..." अशाच भावना व्यक्त करणारे होते. आयपीएल आधी क्लब क्रिकेट खेळताना राहुल द्रविडच्या पायला दुखापत झालीये. तरी तो संघातील खेळाडूंसोबत असल्याचे दिसून येते.
इंग्लंड विरुद्धच्या सामन्यात जोफ्राच्या चेंडूवर झाली होती दुखापत
घरच्या मैदानातील भारत- इंग्लंड यांच्यातील टी-२० सामन्यात संजू सॅमसन दुखापत झाली होती. इंग्लंडच्या संघातील जलदगती गोलंदाज जोफ्रा आर्चरचा वेगवान चेंडू त्याच्या बोटाला लागला होता. या दुखापतीमुळे ६ आठवडे संजूला क्रिकेटच्या मैदानापासून दूर राहावे लागले. आता आयपीएलमध्ये जोफ्रा आर्चर हा देखील राजस्थान रॉयल्सच्या ताफ्यातूनच खेळताना दिसणार आहे.