Virat Kohli RCB Retention List, IPL 2025: एकीकडे भारतीय संघाच्या आगामी कसोटी मालिकेची चर्चा रंगली असतानाच दुसरीकडे आगामी IPL 2025 च्या लिलावाबाबत आणि रिटेन खेळाडूंबाबतही तुफान चर्चा सुरु आहेत. प्रत्येक संघ आपल्या कुठल्या खेळाडूंना संघात कायम ठेवायचे आणि कुणाला रामराम ठोकायचा याचा विचारविनिमय करताना दिसत आहे. आतापर्यंत एकही विजेतेपद न जिंकलेला RCB संघदेखील यावेळी वेगळ्या विचाराने जाताना दिसतोय. एका रिपोर्टनुसार, बंगळुरूचा संघ फाफ डु प्लेसिसला संघात रिटेन करणार नसल्याची शक्यता आहे. म्हणजेच विराट कोहली पुन्हा एकदा RCBचा कर्णधार म्हणून दिसण्याची दाट शक्यता आहे. अशातच RCBने एक फोटो पोस्ट केला असून त्यात ते रिटेन करू शकतील अशा काही खेळाडूंची नावे दिली आहेत.
RCBच्या सोशल मीडिया हँडलवर एक कोडं घालण्यात आले आहे. त्यांनी एक फोटो पोस्ट केला असून त्यात अनेक खेळाडूंची नावे दडली आहेत. या नावांच्या अंदाजाने चाहत्यांना यंदा RCB कुणाला रिटेन करेल, याचा अंदाज व्यक्त करण्यास सांगितले आहे. RCB च्या पोस्टमध्ये जो फोटो पोस्ट केला आहे त्यासोबत कॅप्शन देखील लिहिण्यात आले आहे. 'नेहमी तुम्ही जे पाहता तेच सत्य असतं असं नाही. तुम्हाला जे पाहायची इच्छा असते ते तुम्ही पाहता. या कोड्यात आपल्या खेळाडूंची रिटेन लिस्ट लपली आहे. तुम्ही हे कोडं सोडवू शकता का ते पाहूया, अशा कॅप्शनसह हा फोटो पोस्ट करण्यात आला आहे.
'या' खेळाडूंना रिटेन करणार
कोडं म्हणून पोस्ट केलेल्या फोटोतून चाहत्यांनी काही नावे शोधली आहेत. त्यात विराट कोहली, ग्लेन मॅक्सवेल, यश दयाल, रजत पाटीदार, फाफ डू प्लेसिस, कॅमेरॉन ग्रीन, मोहम्मद सिराज यांची नावे दिसून आली. पण IPLच्या नव्या रिटेन्शन नियमानुसार प्रत्येक संघाला जास्तीत ५ कॅप्ड आणि १ अनकॅप्ड खेळाडू संघात घेता येईल.
अशा परिस्थितीत विराट, मॅक्सवेल, डु प्लेसिस, सिराज आणि कॅमेरॉन ग्रीन हे ५ कॅप्ड खेळाडू संघा घेतले जाऊ शकतात. तसेच यश दयाल हा अनकॅप्ड खेळाडू संघात कायम ठेवला जाऊ शकतो. रजत पाटीदार साठी RTM कार्ड वापरले जाऊ शकते अशीही चर्चा आहे.