Join us

RCB vs PBKS : पावसाच्या बॅटिंगनंतर विराटसह RCB च्या स्टार फलंदाजांची 'घसरगुंडी' अन् पंजाबचा भांगडा!

अल्प धावसंख्येचा पाठलाग करताना पंजाब किंग्जच्या संघानेही ५ विकेट्स गमावल्या, पण...

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 19, 2025 00:50 IST

Open in App

IPL 2025 RCB vs PBKS 34th Match : पंजाब किंग्जच्या संघाने बंगळुरुच्या मैदानात रंगलेल्या सामन्यात घरच्या मैदानात खेळणाऱ्या रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुच्या संघाला पराभूत करत यंदाच्या हंगामातील पाचव्या विजयाची नोंद केलीये. दुसऱ्या बाजूला आरसीबीच्या संघावर घरच्या मैदानात तिसऱ्या पराभवाची नामुष्की ओढावली. पहिल्यांदा फलंदाजी करताना टीम डेविडच्या अर्धशतकाच्या जोरावर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुच्या संघाने निर्धारित १४ षटकांच्या सामन्यात ९ बाद ९५ धावा केल्या होत्या. या धावासंख्येचा पाठलाग करताना पंजाब किंग्जच्या संघानेही ५ विकेट्स गमावल्या. अखेरच्या षटकात सामन्यात ट्विस्ट येतोय असे चित्रही निर्माण झाले होते. पण नेहल वढेरानं आपल्या भात्यातील फटकेबाजीचा नजराणा पेश करत ट्विस्ट दूर करून संघाच्या विजयाचा मार्ग मोकळा केला. त्याने केलेल्या १९ चेंडीतील ३ चौकार आणि ३ षटकाराच्या मदतीने पंजाबच्या संघाने १३ व्या षटकातील पहिल्याच चेंडूवर ५ विकेट राखून विजय नोंदवला.

 'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा! 

घरच्या मैदानातील तिसऱ्या पराभवासह RCB च्या नावे झाला लाजिरवाणा विक्रम

आयपीएलच्या यंदाच्या हंगामात आरसीबीच्या संघाने घरच्या मैदानात तिसरा सामना गमावला आहे. आरसीबी एकमेव अशी टीम आहे ज्यांना यंदाच्या हंगामात घरच्या मैदानात एकही  विजय मिळवता आलेला नाही. या पराभवासह एका मैदानात सर्वाधिक ४६ सामने गमावण्याचा लाजिरवाणा विक्रमही त्यांच्या नावे झाला. यंदाच्या हंगामात गुजरात टायटन्स, दिल्ली कॅपिटल्स यांनीही बंगळुरुच्या मैदानात धावांचा पाठलाग करताना आरसीबीला पराभूत केले होते. त्यात आता पंजाबनंही धावांचा यशस्वी पाठलाग करत बंगळुरुचे मैदान मारले आहे.

IPL 2025 :पदार्पणाच्या सामन्यात जे घडलं तेच १८ वर्षांनी पुन्हा विराट कोहलीच्या वाट्याला आलं

टीम डेविडच्या अर्धशतकानं मोठी नामुष्की टळली

पावसाच्या व्यत्ययामुळे बंगळुरुच्या मैदानातील सामना प्रत्येकी १४-१४ षटकांचा खेळवण्यात आला. पहिल्यांदा फलंदाजी करताना आरसीबीकडून फक्त दोघांनी दुहेरी आकडा गाठला. रजत पाटीदारनं १८ चेंडूत केलेल्या २३ धावांशिवाय टीम डेविडनं २६ चेंडूत ५ चौकार आणि ३ षटकाराच्या मदतीने नाबाद अर्धशतकी खेळी केली. त्याच्या या खेळीच्या जोरावरच आरसीबीच्या संघाने निर्धारित १४ षटकांच्या सामन्यात ९ बाद ९५ धावा केल्या होत्या. पंजाबकडून गोलंदाजीला आलेल्या प्रत्येकाने विकेट घेतलीय अर्शदीपनं पहिल्या २ षटकात २ विकेट्स घेत आरसीबीच्या फलंदाजीला सुरुंग लावला. याशिवाय मार्को यान्सेन, हरप्रीत ब्रार आणि चहल यांनीही प्रत्येकी २-२ विकेट्स आपल्या खात्यात जमा केल्या.  झेवियर बार्टलेच्या खात्यातही एक विकेट जमा झाली. 

 

टॅग्स :इंडियन प्रिमियर लीग २०२५पंजाब किंग्सरॉयल चॅलेंजर्स बेंगलोरविराट कोहलीश्रेयस अय्यर