आयपीएलच्या १८ व्या वर्षांच्या खास क्षणी १८ नंबर जर्सी घरच्या मैदानात धमाका करेल, अशी अपेक्षा होती. पण पदार्पणाच्या सामन्यात जे घडलं तीच नामुष्की विराट कोहलीवर पुन्हा ओढावल्याचे पाहायला मिळाले. बंगळुरुच्या एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर रंगलेल्या रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु विरुद्ध पंजाब किंग्ज यांच्यातील सामन्यात पावसाचा व्यत्यय आला. सामना उशीरा सुरु झाल्यामुळे सामना प्रत्येकी १४-१४ षटकांचा खेळवण्यात आला. पंजाब किंग्ज संघाचा कर्णधार श्रेयस अय्यर याने नाणेफेक जिंकून पहिल्यांदा गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. पहिल्या षटकात अर्शदीप सिंग याने फिल सॉल्टला तंबूचा रस्ता दाखवला. त्यानंतर तिसऱ्या षटकात अर्शदीप पुन्हा गोलंदाजीला आला अन् त्याने विराट कोहलीलाही स्वस्तात माघारी धाडले.
जे पदार्पणाच्या सामन्यात घडलं तेच १८ वर्षांनी पुन्हा दिसलं
आयपीएलच्या पहिल्या हंगामातील पहिला सामना हा १८ एप्रिल २००८ रोजी बंंगळुरुच्या मैदानातच खेळवण्यात आला होता. १९ वर्षीय विराट कोहलीनं वयाच्या १९ व्या वर्षी कोलकाता विरुद्धच्या सामन्यातून आयपीएलमध्ये पदार्पण केले होते. या सामन्यात तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजी करताना ५ चेंडूचा सामना करून तो एका धावेवर बाद झाला होता. अशोक दिंडाने त्याला बोल्ड केले होते. १८ व्या वर्षात १८ नंबर जर्सीची या आकड्यानं पाठ सोडली नाही. पंजाब विरुद्धच्या सामन्यातही तो ३ चेंडूचा सामना करून एकच धाव करून तंबूत परतल्याचे पाहायला मिळाले.
घरच्या मैदानात संघर्षामुळे RCB संकटात सापडण्याची भिती
विराट कोहली हा सध्याच्या हंगामात दमदार कामगिरी करताना पाहायला मिळाले आहे. मागील ६ सामन्यापैकी तीन सामन्यात त्याने अर्धशतकी खेळी केली. पण घरच्या मैदानात त्याला मोठी खेळी करण्यात अपयश आले. परिणामी संघाच्या अडचणीही वाढल्या. विराट कोहली हा पहिल्या हंगामापासून आरसीबीच्या संघाकडून खेळताना दिसतोय. पण या संघाने आतापर्यंत एकही ट्रॉफी जिंकलेली नाही. यंदाच्या हंगामात रजत पाटीदारच्या नेतृत्वाखाली संघाने दमदार सुरुवात केली. दुसऱ्या मैदानात ऐतिहासिक विजयाची नोंद करण्याचा सिलसिला सुरु असताना घरच्या मैदानात मात्र संघ अपयशी ठरताना दिसतोय. हाच सिलसिला कायम राहिला तर दमदार सुरुवात करून पुन्हा एकदा संघ मागे पडू शकतो.
Web Title: IPL 2025 RCB vs PBKS Arshdeep Removes Phil Salt And Virat Kohli Early Brilliant Start For PBKS
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.