आयपीएलच्या १८ व्या वर्षांच्या खास क्षणी १८ नंबर जर्सी घरच्या मैदानात धमाका करेल, अशी अपेक्षा होती. पण पदार्पणाच्या सामन्यात जे घडलं तीच गोष्ट विराट कोहलीसंदर्भात पुन्हा घडल्याचे पाहायला मिळाले. बंगळुरुच्या एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर रंगलेल्या रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु विरुद्ध पंजाब किंग्ज यांच्यातील सामन्यात पावसाचा व्यत्यय आला. सामना उशीरा सुरु झाल्यामुळे प्रत्येकी १४-१४ षटकांच्या सामन्यात नाणेफेक जिंकून श्रेयस अय्यरनं पहिल्यांदा गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. पहिल्या षटकात अर्शदीप सिंग याने फिल सॉल्टला तंबूचा रस्ता दाखवला. त्यानंतर तिसऱ्या षटकात अर्शदीप पुन्हा गोलंदाजीला आला अन् त्याने विराट कोहलीलाही चालते केले.
जे पदार्पणाच्या सामन्यात घडलं तेच १८ वर्षांनी पुन्हा दिसलं
२००८ च्या आयपीएलच्या पहिल्या हंगामातील पहिला सामना हा १८ एप्रिल या दिवशी बंंगळुरुच्या मैदानात खेळवण्यात आला होता. १९ वर्षीय विराट कोहलीनं कोलकाता विरुद्धच्या सामन्यातून पदार्पण करताना तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजी करताना ५ चेंडूचा सामना करून एका धावेवर बाद झाला होता. अशोक दिंडाने त्याला बोल्ड केले होते. १८ व्या वर्षीही १८ नंबर जर्सीसाठी या आकड्यानं पाठ सोडली नाही. ३ चेंडूचा सामना करून तो एक धाव करून तंबूत परतल्याचे पाहायला मिळाले.