IPL 2025 retention By Kavya Maran SRH : आयपीएल २०२५ च्या मेगा लिलावाआधी गत उप विजेत्या सनरायझर्स हैदराबादच्या संघानं पहिल्या पसंतीच्या रिटेन खेळाडूसाठी १८ कोटींचा स्लॅब मोडत अतिरिक्त ५ कोटींसह तब्बल २३ कोटी रुपये खर्च करण्याची तयारी दर्शवली आहे. हेनरिच क्लासेन हा हैदराबादचा पहिल्या क्रमांकाचा रिटेन खेळाडू आहे. त्याच्याशिवाय सलामीवीरांसाठी काव्या मारन यांनी २८ कोटी रुपये मोजण्याचा निर्णय घेतला आहे.
SRH च्या सलामीवीरांच्या पगारात दुप्पट वाढ, ट्रॅविस हेड- अभिषेकसाठी संघानं मोजले २८ कोटी
सलामीवीर ट्रॅविस हेड आणि अभिषेक शर्मा या जोडीला संघाने प्रत्येकी १४-१४ कोटींसह रिटेन केले आहे. मागच्या हंगामात हेडला ६.८० कोटो रुपये मिळाले होते. स्फोटक अंदाजातील फलंदाजीच्या जोरावर त्याची किंमत दुप्पट वाढली असून तो १४ कोटी रुपयांचे पॅकेज मिळणारा खेळाडू ठरला आहे. गत हंगामात अभिषेक शर्मा हा देखील ६.५० कोटींसह हैदराबादकडून खेळला होता. त्याचा भावही दुप्पट वाढल्याचे दिसून येते.
मिनी लिलावात भाव खाणाऱ्या पॅटचा भाव घसरला
मिनी लिलावात २०.५० कोटी एवढी कमाई करणाऱ्या पॅट कमिन्स हा संघाचा दुसरा रिटेन खेळाडू आहे. १८ कोटींसह सनरायझर्स हैदराबादनं त्याला कायम ठेवल्याचे दिसते. त्याच्यासह नितीश कुमार रेड्डीसाठी संघाने ६ कोटी रुपये खर्च केले आहेत. गत हंगामात तो अवघ्या २० लाख या मूळ किंमतीसह संघाचा भाग होता. एका बाजूला टीम इंडियात एन्ट्री आणि दुसऱ्या बाजूला आयपीएलमध्ये आता त्याला कॅप्ड खेळाडूंच्या गटातून कोट्यधीशांच्या क्लबमध्ये एन्ट्री असे काहीसे चित्र दिसून येत आहे.
काव्या मारन यांची तगडी शॉपिंग, मेगा लिलावाआधी पर्समधून काढले ७५ कोटी
सनरायझर्स हैदराबादच्या काव्या मारन यांनी मेगा लिलावाआधी तगडी शॉपिंग करताना पर्समधून ७५ कोटी रुपये खर्च केले आहेत. ५ खेळाडूंसाठी तगडी रक्कम खर्च केल्यावर आता त्यांच्या पर्समध्ये ४५ कोटी शिल्लक असतील. या ४५ कोटीसह ते मेगा लिलावात तगडी टीम बांधणी करण्याचा प्रयत्न करतील.